पाणीदार कोल्हापूरवर उपसा बंदीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:11 AM2019-04-19T01:11:28+5:302019-04-19T01:11:32+5:30

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून ...

Due to ban imposed ban on Kolhapur water heated | पाणीदार कोल्हापूरवर उपसा बंदीचे सावट

पाणीदार कोल्हापूरवर उपसा बंदीचे सावट

googlenewsNext

नसिम सनदी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : निवडणुका असल्यामुळे कोणाला दुखवायला नको म्हणून लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे पाटबंधारे विभागाकडून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. यामुळे नद्या सतत प्रवाहित राहत असल्या तरी धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.
आजच्या घडीला असलेला पाणीसाठा हा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. पाऊस लांबला तर पाणीबाणी येण्याची शक्यता गृहीत धरून धरणांतील आवर्तन कमी करण्याचे नियोजन सुरू केल्याने पुढील महिन्यात उपसाबंदीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. निवडणुका संपल्यानंतर याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले आहेत.
यावर्षी साधारण पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असला तरी पूर्वानुभव पाहता जुलैच्या पहिल्या पंधरवड्यापासूनच पावसाला सुरुवात होते. त्यामुळे जूनमध्ये शेती व पिण्यासाठी पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होणार हे गृहीत धरून धरणांतील पाण्याचे आवर्तन निश्चित केले जाते. साधारणपणे फेब्रुवारी-मार्चपासूनच पाणी सोडण्याविषयी हात आखडता घेतला जातो; पण यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने पाण्याचा विषय निवडणुकीचा मुद्दा होऊ नये याची दक्षता सत्ताधारी आणि विरोधक या दोघांकडूनही घेतली गेली आहे. नदी वाहती राहावी या संदर्भातील पत्रव्यवहार लोकप्रतिनिधींनी आधीच करून ठेवल्यामुळे धरणातून रोजच्या रोज पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा वाढत असतानाही जिल्ह्याच्या दोन्ही मतदारसंघांतील नद्या दुथडी भरून वाहताना दिसत आहेत.
राधानगरी, वारणा, दूधगंगा या धरणांतील पाण्यावर बहुतांश जिल्ह्याची भिस्त आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याने साठा कमी झाल्याने उपलब्ध पाणी जूनअखेरपर्यंत पुरविण्याचे आव्हान पाटबंधारे विभागासमोर आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राधानगरी धरणातील साठा पुरेसा असल्याने पंचगंगा खोºयातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या वापरावर काही परिणाम जाणवणार नाही; पण आवर्तनाच्या बाबतीत हात आखडता घेतला नाही तर मात्र मेअखेरीस पाणीबाणी जाणवण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘पाटबंधारे’च्या दक्षिण विभागांतर्गत येणाºया चिकोत्रा खोºयात आवर्तनाच्या बाबतीत नियमावली तयार केली आहे. हिरण्यकेशीमधून काही प्रमाणात उपसाबंदीची अंमलबजावणी झाली आहे. काळम्मावाडी प्रकल्पातून १५ टक्के पाणी कर्नाटकला द्यावे लागत असल्याने गतवर्षीपेक्षा साडेतीन टीएमसीने पाणीसाठा कमी झाला आहे.
वारणेचा विसर्ग वाढला
सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने म्हैसाळ योजनेसाठी कोल्हापुरातील वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वारणेतून दरवर्षी नऊ टीएमसी पाणी सोडले जाते. यावर्षी आजअखेर १३ टीएमसी पाणी म्हैसाळला दिले. विसर्ग ४ टीएमसीने वाढल्याने धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यापर्यंत खाली आला आहे. आजच्या घडीला ८.४४ टीएमसी पाणीसाठा आहे, तो गेल्या वर्षी याचवेळी १४.६२ टक्के होता. गेल्या वर्षी आठ टीएमसी पाणी धरणात शिल्लक राहिले असल्यामुळे हे आवर्तन वाढविले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी पाऊस लांबला तर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, याचीही त्यांना कल्पना आहे. त्यामुळे म्हैसाळमधून जत, कवठेमहांकाळसाठी वारणेऐवजी कोयनेतून पाणी उचलावे याबाबतीत पाठपुरावा सुरू आहे. मतदान झाल्यानंतर याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे.


जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
धरण आजचा गतवर्षीचा
राधानगरी २.९८ ३.६९
तुळशी १.५३ १.८३
वारणा ८.४४ १४.६२
दूधगंगा ६.५४ १०.०३
कासारी १.२० १.२६
कडवी १.३३ -
कुंभी १.३० -

धरण आजचा गतवर्षीचा
(दशलक्ष घनमीटर)
चित्री १७.८५ १६.८९
चिकोत्रा २१.४३ ९.१४
पाटगाव ४१.२६ ४४.२९
जंगमहट्टी १४.८७ १३.१६
जांबरे ६.२० ७.४८
घटप्रभा २२.७५ २४.४३

Web Title: Due to ban imposed ban on Kolhapur water heated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.