कडवी नदीमुळे बांबवडे परिसर होतोय सुजलाम् सुफलाम्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:51+5:302021-04-07T04:24:51+5:30
अनिल पाटील सरूड : कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून बांबवडे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक गावांमध्ये ...
अनिल पाटील
सरूड : कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून बांबवडे परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अनेक गावांमध्ये शेतीसाठी पाणी मिळाल्याने या परिसरातील कोरडवाहू असणाऱ्या शेती क्षेत्रासाठी कडवी नदी वरदान ठरत आहे. सध्या बांबवडे परिसरातील आठ गावांतील सुमारे १ हजार एकराहून अधिक शेतीक्षेत्र कडवी नदीवरील उपसा जलसिंचन योजनेद्वारे ओलिताखाली आले आहे. एकेकाळी पाण्याअभावी ओसाड असलेला हा भाग कडवी नदीच्या पाण्यामुळे हळूहळू सुजलाम् सुफलाम् होऊ लागला आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या बांबवडे परिसरातील अनेक गावांत शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वर्षानुवर्षे केवळ पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहवे लागत होते.
पावसाळी पिके सोडल्यास पाण्याअभावी या परिसरात बारमाही पीक घेणे शेतकऱ्यांना शक्य होत नव्हते; परंतु अलीकडील काही वर्षांत बांबवडेसह भाडळे, डोणोली, खुटाळवाडी, सुपात्रे, साळशी, सोनवडे, गोगवे आदी गावांतील काही शेतकऱ्यांनी एकत्रित येत कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे आपापल्या गावात शेतीसाठी पाणी आणल्याने या गावांतील पाण्यापासून वंचित असणारी शेतजमीन हळूहळू ओलिताखाली येऊ लागली आहे.
निनाई परळे येथील कडवी मध्यम प्रकल्पामुळे कडवी नदी बारमाही दुथडी वाहत असल्याने बांबवडे परिसरातील शेतीसाठीही बारमाही पाणी उपलब्ध होत आहे. परिणामी, येथील शेतकरी उसासारखी बारमाही पिके घेऊ लागले आहेत. त्यामुळे या परिसरातील ऊसलागवडीच्या क्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बांबवडे परिसरातील ८ गावांत
२० उपसा जलसिंचन योजना
सध्या या परिसरातील ८ गावांमध्ये २० उपसा जलसिंचन योजनांच्या माध्यमातून सुमारे पाच ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कडवी नदीवरून शेतीसाठी पाणी आणण्यात आले आहे. यामध्ये भाडळे येथील १, डोणोली- ६, खुटाळवाडी- २, सुपात्रे- १, साळशी- ३, सोनवडे- १, बांबवडे- १, गोगवे- ५ या उपसा जलसिंचन योजनांचा समावेश आहे. भविष्यात या परिसरातील आणखी काही शेतकरी कडवी नदीवरून उपसा जलसिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी नेणार असल्याने या परिसरातील ओलिताखाली येणाऱ्या क्षेत्रामध्ये आणखी वाढ होणार आहे.