पन्हाळ्यावरील ऐतिहासिक वास्तू बंद ठेवल्याने अस्वच्छतेच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:17 AM2021-06-10T04:17:11+5:302021-06-10T04:17:11+5:30
पन्हाळा : स्वच्छ व निर्सगरम्य पन्हाळ्यावरच्या ऐतिहासिक वास्तू कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून बंद ठेवल्याने अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्या असून ...
पन्हाळा : स्वच्छ व निर्सगरम्य पन्हाळ्यावरच्या ऐतिहासिक वास्तू कोरोना संसर्ग फैलावू नये म्हणून बंद ठेवल्याने अस्वच्छतेच्या विळख्यात सापडल्या असून बहुतेक इमारतींवर झाडोरा उगवल्याने काही ठिकाणचे दगड निसटले तर इमारतीला तडे गेल्याने हा ऐतिहासिक वारसा पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणाने अल्प आयुष्याचा ठरतो की काय, असे भाकीत होऊ लागले आहे
पन्हाळा शहरात येणारा रस्ता अतिवृष्टीने घसरल्याने २०१९ मध्ये शहर सलग एक वर्ष बंद होते तर कोरोना संसर्ग फैलाऊ नये म्हणून २०२० मध्ये सलग नऊ महिने या ऐतिहासिक इमारती बंद राहिल्या. आता सलग तिसऱ्या वर्षी मार्च महिन्यापासून या इमारती बंद आहेत. इमारती बंद राहिल्या तरी त्यांची आतील व बाहेरील स्वच्छता पुरातत्त्व खात्याने करणे क्रमप्राप्त असतानाही या ऐतिहासिक इमारतींकडे या विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने बहुतेक इमारतींवर झाडोरा उगवला असून या झाडोऱ्याला पावसाचे पाणी मिळत असल्याने त्याची वाढ वेगाने होवू लागली आहे. यामुळे काही ठिकाणी दगड निसटू लागलेत. काही ठिकाणी इमारतीला भेगा पडल्या आहेत. या भेगांमध्ये पावसाचे पाणी गेल्यावर इमारत निश्चित कमकुवत होणार असून हा ऐतिहासिक ठेवा अल्पायुशी ठरणार का अशी शंका येऊ लागली आहे.
या बाबत पुरातत्त्वचे विभागीय अधिकारी विजय चव्हाण यांच्याबरोबर संपर्क केला असता ते म्हणतात की, ऐतिहासिक इमारती स्वच्छतेसाठी माझ्या कार्यालयाकडून प्रस्ताव दिल्ली कार्यालयाकडे पाठवावा लागतो. तो मंजूर होण्यास किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर दिल्ली कार्यालय याचे टेंडर प्रसिद्ध करते व ठेकेदारामार्फत ही स्वच्छता केली जाते. माझ्या कार्यालयाकडे पाच जिल्हे व त्यातील तेरा ठिकाणचे प्रतिवर्षी मी प्रस्ताव पाठवतो. पण हे सर्व वेळेत होत नाही, त्यामुळे ऐतिहासिक इमारतींची हेळसांड होताना मी पाहतोय. पण काहीही करू शकत नाही, मग पुरातत्त्व विभाग खरच हा ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम करतो का, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच येते. मग हे पुरातत्त्व कार्यालय निरुपयोगी म्हणून आपला वेगळा ठसा उमटवत असल्याचे जाणवते.
फोटो------- पन्हाळ्यावरील ऐतिहासिक इमारतींवर मोठ्या प्रमाणात उगवलेला झाडोरा.