एलबीटी बंदमुळे विकासकामे ठप्प
By admin | Published: August 14, 2015 11:40 PM2015-08-14T23:40:27+5:302015-08-14T23:40:27+5:30
स्थायी सभेत नाराजी : केएमटी बसच्या दर्जाबाबत चौकशी करून कारवाई करणार
कोल्हापूर : एलबीटी सवलतीमुळे महापालिकेच्या उत्पन्नावर व वसुलीवर मोठा परिणाम झाला असून आयुक्तांनी मंजूर कामांसाठी निधी देण्याचे थांबविले आहे. त्यामुळे शुक्रवारच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंजूर कामे थांबविणे योग्य नसल्याचे सांगत पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. स्थायी समितीची सभा शुक्रवारी सभापती सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. संभाजी जाधव यांनी शहरातील ५४ उद्यानांतून खेळणी आणि बाकडी बसविण्याचे काय झाले, अशी विचारणा केली. त्यावेळी एलबीटी रद्द झाल्याने त्याचा परिणाम विकासकामांवर झाला आहे. निधी नसल्याने कामे थांबविण्यात आल्याचा खुलासा प्रशासनाने केला. त्यावर सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र, निधी नसल्याचे कारण न सांगता काही तरी मार्ग काढा आणि खेळणी व बाकडी बसवा, अशी सूचना जाधव यांनी केली.
शहरात आणि उपनगरांत उपनगरात सीसीटीव्ही बसवावेत, अशी सूचना शारंगधर देशमुख यांनी केली. नवीन दाखल झालेल्या के.एम.टी. बसची चाके निखळून पडल्याने बसच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी संगीता देवेकर यांनी केली. त्यावर चौकशी सुरू असून कारवाई निश्चित केली जाईल, असे सांगितले.