सभासदाचे वाहन बंद केल्याने ‘कुंभी’वर पडसाद
By admin | Published: January 29, 2015 12:48 AM2015-01-29T00:48:45+5:302015-01-29T00:53:22+5:30
काटा पाडला बंद : चंद्रदीप नरकेंच्या हस्तक्षेपानंतर काटा सुरू
कोल्हापूर : चार दिवस मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रकाश पाटील या सभासदाचे ऊस वाहतुकीचे वाहन राजकीय आकसापोटी अचानक बंद केल्याने ‘कुंभी बचाव मंच’ने शेती अधिकाऱ्यांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने व वाहतुकीस पुन्हा परवानगी न दिल्याने वे-ब्रीजकडे कार्यकर्त्यांनी मोर्चा वळविला व काटा बंद पाडला. आमदार चंद्रदीप नरके यांनी वाहन सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर आंदोलक शांत झाले.
हंगाम २०१४-१५ साठी प्रकाश पाटील यांनी दोनचाकी ट्रॉली ऊस वाहतूक करार केला होता. गेले दीड महिना ते दोनचाकी ट्रॉलीने ‘कुंभी-कासारी’साठी वाहतूक करीत आहेत. मात्र, गेल्या सोमवारपासून त्यांचे ऊस वाहतूक करणारे वाहन शेती विभागाकडून अचानक बंद करण्यात आल्याचे पाटील यांना सांगण्यात आले.
याबाबत प्रकाश पाटील यांनी शेती अधिकारी सुरेश अपराध यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाहन दोन दिवसांत पुन्हा ऊस वाहतुकीसाठी घेऊ, असे आश्वासन दिले. मात्र, आठ दिवस झाले तरी पुन्हा ऊस वाहतूक करण्यासाठी शेती विभागाकडून सहकार्य होत नव्हते. ही बाब समजल्यामुळे ‘कुंभी बचाव मंच’ने कारखान्यावर येऊन शेती अधिकारी सुरेश अपराध, उपाध्यक्ष शामराव गोधडे व ज्येष्ठ संचालक यांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी कारखाना प्रशासनाकडून योग्य उत्तर न मिळाल्याने मंचच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत वे-ब्रीजकडे मोर्चा वळविला व काट्यावर कार्यकर्त्यांनी ठाण मांडत सुमारे एक तास काटा बंद पाडला. यानंतर कुंभीचे अध्यक्ष आमदार चंदद्रीप नरके यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना आदेश देऊन वाहन तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर वातावरण शांत झाले.