पोलीस स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली
By admin | Published: October 21, 2015 11:05 PM2015-10-21T23:05:37+5:302015-10-21T23:05:37+5:30
पोलीस प्रशासन : बँड पथकाची मानवंदना; बंदुकीच्या तीन फैरींची सलामी
कोल्हापूर : देशासाठी धारातीर्थी पडलेल्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस बुधवारी पोलीस प्रशासनाच्या वतीने स्मृतिस्तंभावर विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरींची सलामी देण्यात आली. तसेच पोलीस बँड पथकाने बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली.
पोलीस हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी पोलीस कवायत मैदान येथे बुधवारी सकाळी आठ वाजता ‘पोलीस स्मृतिदिन’ पाळण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आमदार उल्हास पाटील यांनी स्मृतिस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. लडाख येथे २० आॅक्टोबर १९५९ रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे दोन जवान हरविले होते. त्यांचा शोध घेण्याकरिता आय.टी.बी.पी. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २२ जवानांची एक तुकडी २१ आॅक्टोबरला गेली होती. या तुकडीवर ‘हॉट स्प्रिंग्ज’ या ठिकाणी चिनी सैनिकांनी अचानक शस्त्रांनिशी जोरदार हल्ला चढविला. त्यामध्ये १० पोलीस जवान मृत्युमुखी पडले, पाच जवान जखमी झाले, तर सात जवानांना चिनी सैनिकांनी ताब्यात घेतले. शत्रूशी निकराची लढत देताना या शूर वीरांनी देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ आॅक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलांच्यावतीने ‘पोलीस स्मृतिदिन’ म्हणून पाळला जातो. २०१४ मध्ये पोलीस व निमलष्करी पोलीस दलाचे एकूण ४३४ पोलीस अधिकारी व कर्मचारी कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडले आहेत. यावेळी कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, पोलिसांना फक्त कायदा व सुव्यवस्था पाहावी लागत नसून हिंसाचारी, गुन्हेगारी, दहशतवादी आणि समाजद्रोही यांच्याशी सामना करावा लागतो. नागरिकांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य बजावीत असताना अनेक पोलीस अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. एका पोलीस शिपायाचा मुलगा कुलगुरू होतो आणि पोलीस हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करतो, ते भाग्य लाभल्याचा भावनिक उल्लेखही त्यांनी यावेळी केला. (प्रतिनिधी)