दूषीत पाण्यामुळे शेतीचे नुकसान
By admin | Published: July 27, 2014 12:52 AM2014-07-27T00:52:07+5:302014-07-27T01:08:35+5:30
रसायनयुक्त पाणी : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
जयसिंगपूर : येथील ल. क अकिवाटे औद्योगिक वसाहतीतून सोडण्यात आलेल्या रसायनयुक्त पाण्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पाणी सोडणे बंद न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, याप्रश्नी शिरोळ तहसील कार्यालयाकडे तक्रारी अर्जही दिला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून या वसाहतीतून मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वसाहतीच्या पूर्व भागात असणाऱ्या शेतपिकाला मोठा फ टका बसला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेतात बियाण्यांची पेरणी केली आहे. बियाण्यांची उगवण झालेली असतानाच रसायनयुक्त दूषित पाणी पिकांत साचल्याने पिके वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
सोयाबीन, भुईमूग, पालेभाज्या, आदी पिकांना फ टका बसला आहे. याप्रश्नी उमेश शिंदे, किरण शिंदे यांनी तहसील कार्यालयाकडे तक्रारी दिल्यानंतर तलाठ्यांनी पंचनामाही केला आहे. प्रशासनाकडून योग्य दखल न घेतल्यास न्यायालयातही जाण्याची तयारीही शेतकऱ्यांनी दर्शविली आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (प्रतिनिधी)