‘कोरोना’मुळे विमानतळांवर उत्पादने पडून; औद्योगिक वसाहतींमधील उलाढालीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 10:46 AM2020-03-14T10:46:05+5:302020-03-14T11:41:32+5:30

निर्यातीसाठीचे उत्पादन निर्मिती करणाऱ्यांना जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल-हातकणंगले पंचतारांकित, आदी औद्योगिक वसाहतींमधील मध्यम आणि लघु कंपन्यांकडून उत्पादनांचा पुरवठा होतो. या कंपन्यांतील उत्पादन निर्मिती देखील ३० ते ३५ टक्क्यांनी मंदावली आहे.

 Due to 'corona', exports to Kolhapur declined by 5% | ‘कोरोना’मुळे विमानतळांवर उत्पादने पडून; औद्योगिक वसाहतींमधील उलाढालीवर परिणाम

‘कोरोना’मुळे विमानतळांवर उत्पादने पडून; औद्योगिक वसाहतींमधील उलाढालीवर परिणाम

Next
ठळक मुद्दे कोल्हापूरची निर्यात ४० टक्क्यांनी घटली

कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराचा फटका कोल्हापूरमधील निर्यातीला बसला आहे. साधारणत: ४० टक्क्यांनी निर्यात घटली आहे. अनेक कंपन्यांची उत्पादने विविध कार्गो विमानतळावर पडून आहेत. निर्यात घटल्याने जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमधील उत्पादन निर्मिती आणि उलाढाल देखील कमी झाली आहे.

कास्टींग, मशीन्ड कंपोनंट (विविध यंत्रासाठी लागणारे सुटे भाग), आॅटोमोटिव्ह व आॅईल इंजिन, आदींची निर्यात जगभरातील विविध देशांमध्ये होते. कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे त्यातील अनेक देशांमधील आंतरराष्ट्रीय विमानसेवा स्थगित केली आहे. काही कंपन्यांनी उत्पादन प्रक्रिया थांबविली आहे. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या निर्यातीवर झाला आहे. येथील निर्यात क्षेत्रात २० कंपन्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडून झालेली उत्पादने त्यांनी करार झालेल्या परदेशांमधील कंपन्यांना गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी पाठविली आहेत. मात्र, विमानसेवा स्थगित असल्याने मुंबईसह अन्य ठिकाणच्या कार्गो आणि इतर विमानतळांवर ही उत्पादने पडून आहेत. उत्पादन निर्मितीची नवीन कामे परदेशी कंपन्यांकडून थांबविण्यात आली आहेत. त्याचा परिणाम कोल्हापूरमधील निर्यात घटण्यावर झाला आहे.

निर्यातीसाठीचे उत्पादन निर्मिती करणाऱ्यांना जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव, शिरोली, कागल-हातकणंगले पंचतारांकित, आदी औद्योगिक वसाहतींमधील मध्यम आणि लघु कंपन्यांकडून उत्पादनांचा पुरवठा होतो. या कंपन्यांतील उत्पादन निर्मिती देखील ३० ते ३५ टक्क्यांनी मंदावली आहे. आधीच असलेली मंदीची स्थिती आणि आता त्यात कोरोनाच्या पडलेल्या भरीने उद्योजकांची चिंता वाढविली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील परिस्थिती सुधारण्याची प्रतीक्षा उद्योजक करीत आहेत.

कच्च्या मालाची कमतरता
चिनी कंपन्यांनी पाठविलेला कच्चा माल भारतातील बंदरात उतरवून घेण्यास कर्मचारी नकार देत आहेत. त्यासह आॅटोमोबाईल, फार्मास्युटिअल, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, आदी उद्योगाला चीनमधून होणारी कच्च्या मालाची आयात पूर्णत: थंडावली आहे. त्यामुळे कच्च्या मालाची कमतरता जाणवत आहे.

कोल्हापूरहून या देशांत होते निर्यात
यूरोप, इटली, फ्रान्स, रशिया, अमेरिका, इटली, जर्मनी, तुर्की, आदी देशांमध्ये कोल्हापूरहून कास्टींग, मशीन्ड कंपोनंट, पंप व व्हॉल्व्ह, ट्रॅक्टर व शेती अवजारे, विविध वाहनांसाठीचे सुटे भाग यांची निर्यात होते.
 

कोरोनामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील निर्यात ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. चीनहून कोल्हापूरमध्ये येणाºया कच्च्या मालाची आयात ठप्प झाली आहे. अशा दुहेरी पद्धतीने औद्योगिक वसाहतीसमोर अडचण निर्माण झाली आहे.
- अतुल पाटील, अध्यक्ष, स्मॅक

आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक ठिकाणी विमानसेवा स्थगित आहे. त्यामुळे कोल्हापूरहून पाठविलेली औद्योगिक उत्पादने संबंधित देशांमध्ये पोहोचलेली नाहीत. त्याचा परिणाम कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रावर काही प्रमाणात झाला आहे.
- संग्राम पाटील, उद्योजक
 

Web Title:  Due to 'corona', exports to Kolhapur declined by 5%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.