अधिकाऱ्यांचा घोळ, पाण्याचा बट्ट्याबोळ वारंवार कोल्हापूर शहर पाणीपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:21 AM2018-08-12T00:21:23+5:302018-08-12T00:21:40+5:30
गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
कोल्हापूर : गेल्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर शहराची तहान भागविणाºया बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रात काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या बिघाडामुळे निम्म्यापेक्षा अधिक शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जुनाट यंत्रणा, ती दुरुस्त करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष आणि अधिकाºयांची अकार्यक्षमता यांमुळे यांत्रिक बिघाडापेक्षा मानसिक बिघाडच अधिक झाल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. गेले आठ दिवस सतत या जलशुद्धिकरण केंद्रात यांत्रिक बिघाड होत असतानाही वरिष्ठ अधिकाºयांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली नसल्याने शनिवारी दुपारी चार वाजता पुन्हा जलशुद्धिकरण केंद्र बंद पडले.
चार उपसा केंद्रे आणि तीन जलशुद्धिकरण केंद्रे असूनही गेल्या महिन्याभरात तांत्रिक बिघाड आणि अधिकाºयांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांचा घसा कोरडा होऊ लागला आहे. आठ दिवसांत सहा वेळा बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र बंद ठेवावे लागले आहे; यावरूनच या केंद्रातील कालबाह्ण यंत्रणा आणि अधिकाºयांचे दुर्लक्ष स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६.४५ वाजता या केंद्राकडील ट्रान्स्फॉर्मर जळाला होता. तो दुरुस्त करेपर्यंत रात्रीचे ९.१५ झाले. त्यामुळे उपसा आणि पुरवठा बंद ठेवण्याची प्रशासनावर नामुष्की ओढवली.
शनिवारी दुपारपर्यंत बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र व्यवस्थित सुरू राहिले; परंतु चार वाजता अचानक वीजपुरवठ्यात व्यत्यय आला. त्यामुळे केंद्राची सर्व प्रक्रिया बंद ठेवावी लागली. जलशुद्धिकरण केंद्र चोवीस तास व्यवस्थित सुरू राहिले आणि चंबुखडी टाकीला पुरेसे पाणी मिळाले तरच संपूर्ण सी व डी वॉर्ड तसेच उपनगरांतील अनेक भागांना पाणीपुरवठा व्यवस्थित होतो. मात्र गेल्या आठ दिवसांत जलशुद्धिकरण केंद्र तब्बल सहा वेळा अनेक तासांसाठी बंद पडले. जरी ते सुरू झाले तरी विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत व्हायला पुन्हा एक दिवस जावा लागतो. बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातील वायरिंग, ट्रान्स्फॉर्मर्स, पंप, पॅनेल बोर्ड कालबाह्ण झाले आहेत. वास्तविक गेल्या काही वर्षांत ही यंत्रणा दुरुस्त व सक्षम करणे आवश्यक होते; पण प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.
पाण्याचे टॅँकरही मिळत नसल्याच्या तक्रारी
ज्यावेळी पाणी येत नाही त्यावेळी पाण्याचे टॅँकर उपलब्ध करून दिले जातात; पण अलीकडे पाण्याचे टॅँकरही मिळत नसल्याने नागरिकांची तक्रार आहेत. शहरातील सी व डी वॉर्ड हा दाट वस्तीचा असल्याने पाण्याची साठवणूक करणे नागरिकांना अशक्य आहे. त्यामुळे रोज पाणी मिळाले नाही तर मात्र नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाण्याचे टॅँकर द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे.
उद्या पुन्हा पाणीपुरवठा बंद
उद्या, सोमवारी बालिंगा जलशुद्धिकरण केंद्र ते चंबुखडी मार्गावरील जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील सी व डी वॉर्डांसह उपनगर भागाचा पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवला जाणार आहे, तर मंगळवारी (दि. १४) तो अपुऱ्या दाबाने होईल.