भाविकांच्या गर्दीने फुलला परिसर

By Admin | Published: August 15, 2016 12:54 AM2016-08-15T00:54:31+5:302016-08-15T00:54:31+5:30

अंबाबाई मंदिर : सलग सुट्यांमुळे पार्किंगसह रस्तेही गजबजले

Due to crowded crowd of devotees | भाविकांच्या गर्दीने फुलला परिसर

भाविकांच्या गर्दीने फुलला परिसर

googlenewsNext

कोल्हापूर : सलग सुट्ट्यांमुळे करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरासह शहरातील बिंदू चौक, मिरजकर तिकटी, भवानी मंडप, महाद्वार रोड, ताराबाई रोड, आदी शहराचा प्रमुख भाग पर्यटकांच्या गर्दीने रविवारी फुलला होता.
शहरापासून जवळच असणारा किल्ले पन्हाळगड, वाडी रत्नागिरी येथील जोतिबा, नृसिंहवाडी, आदमापूर, आदी पर्यटनस्थळांवर पर्यटकांचा राबता दिवसभर होता. सलग सुट्ट्यांमुळे गेले दोन दिवस शहर आणि परिसरात वाहनांची वर्दळ वाढली आहे. करवीरनिवासिनीच्या दर्शनासाठी गेल्या दोन दिवसांत हजारो भाविकांनी मंदिर परिसरात हजेरी लावली. यासह पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडी, विशाळगड येथे जाण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानक येथे रविवारी दिवसभर गर्दी दिसत होती. वाढत्या पर्यटकांमुळे वाहनतळाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगची समस्या भेडसावत आहे. रविवारी वाढत्या पर्यटकांमुळे बिंदू चौक, लक्ष्मी रोड, मिरजकर तिकटी, शिवाजी चौक, पापाची तिकटी या परिसरात वाहनांची कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. त्या ठिकाणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस कर्मचारी तत्परतेने जाऊन तेथील वाहतूक सुरळीत करत होते. वाढती वाहनसंख्या लक्षात घेता पंचगंगा नदी परिसर, खानविलकर पंपाशेजारील मोकळी जागा, दसरा चौक, आदी ठिकाणी जादा वाहनतळाची सोय करण्यात आली होती.
नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्व सोहळा सुरू झाल्याने या ठिकाणीही जाण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरूनही पर्यटक कोल्हापुरात दाखल होत आहेत. नृसिंहवाडी येथे दत्त दर्शन आणि स्नान सोहळा झाल्यानंतर थेट पर्यटक कोल्हापूर शहरात दाखल होत आहेत.
सुरक्षा रक्षकांचा असाही प्रामाणिकपणा
अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी गर्दी झाल्याने महिलांच्या पर्स जाण्याचे प्रकार घडले. त्यात तीन महिलांच्या पर्स मंदिरातील संदीप साळोखे, विजय सूर्यवंशी, यशवंत सावंत या सुरक्षा रक्षकांनी ओळख पटवून परत दिल्या. तर दोन महिलांच्या पर्सची चोरी झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली. महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या एका तरुणास सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांनी चोप देत सोडून दिले.

Web Title: Due to crowded crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.