सवलतींमुळे दिवसभरात वाहन विक्रीचा टक्का वाढला
By admin | Published: March 30, 2017 06:56 PM2017-03-30T18:56:24+5:302017-03-30T18:56:24+5:30
बीएस-३ वाहन विक्रीचा उद्या शेवटचा दिवस ; १ एप्रिलपासून भारत स्टेज -४ गाडयांचीच विक्री
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : भारत स्टेज-४ (बीएस ४) या मानके असलेलीच वाहने विक्रेत्यांना विकता येणार आहेत. या निर्णयामुळे गुरुवारी दिवसभर भारत स्टेज-३ (बीएस-३) मानके असलेली दुचाकीसह चारचाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यात अगदी १० हजारापासून ते ४० हजारांपर्यंत किंमतीत सवलत देण्यात आली.
सवोच्च न्यायालयाने भारत स्टेज-३ (बीएस ३) वाहनांच्या विक्री व नोंदणीवर कार्बन उत्सर्जनामुूळे नागरीकांवर होणाऱ्या परिणामांचा विचार करुन बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारपासून देशभरात बीएस-४ मानके असलेलीच वाहने कंपन्यांना विक्री करता येणार आहेत. आतापर्यंत उत्पादीत केलेली दुचाकीसह चारचाकी वाहने ही बीएस-३ मानके असलेली होती. त्यांचा स्टॉक तसाच राहणार म्हणून कंपन्यांनी नामी शक्कल लढवत अगदी १० हजारापासून ४० हजारांपर्यंत किंमतीत सुट दिली. याशिवाय वर्षभराचा विमाही मोफत देऊ केला. त्यामुळे एका दिवसात काही विक्रेत्यांकडील शिल्लक दुचाकी हातोहात खपल्या.
देशभरासह त्याचा परिणाम कोल्हापूरातही झाला. या बीएस-३ मानके असलेली वाहने विक्रीस बंदीच्या निर्णयामुळे बुधवारी सायंकाळपासून किंमती कमी झाल्याचे संदेश सोशल मिडीयावरुन सर्वत्र फिरु लागले. गुरुवारी तर अनेकांनी किंमती कमी झाल्याचा फायदा घेत वाहन खरेदी केली. यात ३१ मार्च २०१७ पर्यंत विक्री व खरेदी झालेली वाहने प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी होणार आहे. त्यामुळे गुरुवारी दुचाकी व चारचाकी वाहन विक्रेत्यांकडे खरेदीसाठी सणासुदीच्या मुहुर्ताप्रमाणे गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.
काय आहेत बीएस मानके...
भारत स्टेज (बीएस) मानकाची २००० साली कार्यवाही करण्यात आली. यात वाहनांसह इंजिनमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित घटकांमुळे मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्यात आला. त्यातून मानके केंद्र सरकारने जाहीर केली. पर्यावरण, वने आणि वातावरणातील बदल मंत्रालयाच्या अखत्यारीतील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही मानके आणि त्याची कार्यवाही यांचे वेळापत्रक निश्चित केले. युरो नियमकानूसार भारत स्टेज (बीएस) निश्चित केले जातात. एप्रिल २०१० पासून १३ मोठ्या शहरात बीएस-४ ची कार्यवाही सुरु केली. आता ही देशभरात सर्वत्र १ एप्रिल २०१७ पासून होत आहे.
३१ मार्च २०१७ पर्यंत जी वाहने खरेदी विक्रीच्या प्रक्रीयेत आली आहेत. अशा वाहनांची नोंदणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे होणार आहे. १ एप्रिल २०१७ पासून युरो मानांकनाच्या धर्तीवर केवळ बीएस-४(भारत स्टेज-४) ही मानके असलेल्या वाहनांचीच नोंदणी कार्यालयाकडे केली जाणार आहे. याची दखल सर्व नागरीकांना घ्यावी
डॉ. डी.टी.पवार
प्रादेशिक परिवहन अधिकारी