सर्व्हर डाऊन झाल्याने रेशनवरील धान्य विक्री ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 06:08 AM2019-05-11T06:08:57+5:302019-05-11T06:09:25+5:30
महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे.
- प्रवीण देसाई
कोल्हापूर - महाराष्ट्र दुष्काळाच्या खाईत आहे. गरीब आणि विशेषत: दुष्काळग्रस्त जनतेच्या पोटापाण्याचा मुख्य आधार असणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांमधून गेल्या काही दिवसांपासून रेशन विक्रीच ठप्प झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे इ-पॉस मशीन्स बंद झाल्याने ही परिस्थिती ओढविली आहे. राज्यभरात १ कोटी ५४ लाख ९७ हजार ६११ रेशनकार्डधारक असून, त्यांना गेल्या तीन दिवसांपासून रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही.
इ-पॉस मशीनवर अंगठा लावल्यानंतर ग्राहकांना रेशनवर धान्य मिळाल्याने गैरप्रकारांना थोडा आळा बसला आहे. सरकारच्या या निर्णयाचे रेशन दुकानदार व त्यांच्या संघटनांनीही स्वागत केले आहे; परंतु या मशीनमधील तांत्रिक दोष काढण्यात पूर्णत: यश न आल्याने सर्व्हर डाऊन झाल्यावर ही मशीन बंद पडण्याचे प्रकार अधूनमधून सर्रास घडत आहेत. यावेळी सलग तीन दिवस हा तांत्रिक बिघाड कायम राहिला असून त्याला कोणी वालीच नसल्यासारखी परिस्थिती आहे.
राज्य सरकारने व्हिजन टेक, लिंकवेल व ओअॅसिस या तीन कंपन्यांकडून इ-पॉस मशीन भाड्याने घेऊन ती दुकानदारांना दिली आहेत. यासाठी जिल्हा किंवा तालुकास्तरावर तंत्रज्ञाची नियुक्ती करणे आवश्यक आहे; परंतु ती केलेली नाही.
तसेच तांत्रिक माहिती देण्याकरिता प्रशासकीय अधिकारीही नेमलेला नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांतर्फे थेट राज्याच्या पुरवठा विभागाच्या सचिवांशीच संपर्क साधावा लागतो. त्यांच्याकडूनही नीट खुलासा झाला नसल्याचे सांगण्यात आले.
सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील इ-पॉस मशीन बंद असून, रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद आहे. राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप न करता बघ्याची भूमिका घेत आहे. हा प्रश्न मार्गी न लावल्यास तीव्र आंदोलन केले जाईल.
-चंद्रकांत यादव, राज्य प्रवक्ते, रेशन बचाव समिती