वस्त्रनगरीतील दिवाळीवर मंदीचे सावट

By admin | Published: October 25, 2016 12:12 AM2016-10-25T00:12:43+5:302016-10-25T01:15:09+5:30

उलाढालीवर परिणाम : वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना फटका; कामगारांच्या बोनस रकमेमध्ये घट

Due to a downturn in the clothing market, | वस्त्रनगरीतील दिवाळीवर मंदीचे सावट

वस्त्रनगरीतील दिवाळीवर मंदीचे सावट

Next

इचलकरंजी : वर्षभर वस्त्रोद्योगात असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम यंदाच्या दीपावली सणावर झाल्याचे दिसून येत आहे. वस्त्रोद्योगातील सर्वच घटकांना मंदीचा फटका बसला असला, तरी साध्या यंत्रमाग कारखान्यांना त्याची तीव्रता अधिक जाणवते आहे. या कारखान्यात उत्पादित होणाऱ्या कापडाला
मागणी नसल्यामुळे भाव मिळत
नाही. परिणामी, नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे साध्या यंत्रमागावर कार्यरत असलेल्या कामगारांच्या दिवाळी बोनसमध्ये कमालीची घट झाली आहे. कामगारांच्या हातात बोनसची साधारणत: ५० ते ६० टक्के इतकीच रक्कम पडणार असल्यामुळे दिवाळी सणाच्या उलाढालीवर त्याचा परिणाम झाला आहे.
शहर व परिसरात सुमारे सव्वा लाख यंत्रमाग, दहा हजार शटललेस व पाच हजार अंशत: स्वयंचलित माग आहेत. यापैकी यंत्रमाग कापडाला फारशी मागणी नसल्यामुळे गेले वर्षभर आर्थिक मंदीमध्ये हा उद्योग भरडला आहे. महाराष्ट्राबरोबर अन्य काही राज्यांत गेली दोन-तीन वर्षे असलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि अन्य उद्योगांमध्ये काहीसे मंदीचे वातावरण असल्यामुळे कापडाला गिऱ्हाईक नाही आणि त्याचा परिणाम वस्त्रोद्योगावर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये असलेली कामगार मजुरी, विजेचे चढे दर आणि आर्थिक भांडवलाची टंचाई यामुळे या उद्योगात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अशा पार्श्वभूमीवर चीनमधून ‘चिंधी’ अशा स्वरुपात स्वस्तातील कापड मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. त्याचे अतिक्रमण आपल्या देशातील यंत्रमाग कापडावर झाले आहे. म्हणून चीनमधून आयात होणाऱ्या कापडावर करामध्ये मोठी वाढ करावी किंवा बंदी घालावी, अशी मागणी यंत्रमाग उद्योगातील प्रातिनिधिक संघटनांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात यंत्रमागासाठी लागणाऱ्या विजेच्या दरामध्ये सवलत मिळावी आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जांवरील व्याज दरात पाच टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली. मात्र, या मागण्या दोन्ही सरकारकडे प्रलंबित आहेत. या सर्वांचा परिणाम यंत्रमाग उद्योगावर झाला असून, हा उद्योग मोठ्या प्रमाणावर अडचणीत आला आहे.
शहर व परिसरात असलेले यंत्रमाग कारखाने, शटललेस आणि अंशत: स्वयंचलित मागांच्या कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व प्रकारच्या कामगारांची संख्या सुमारे ७५ हजार आहे. त्यामध्ये यंत्रमाग कामगार, जॉबर, कांडीवाला, वहिफणीवाला, दिवाणजी, मेंडिंग कामगार अशा विविध प्रकारच्या कामगारांचा समावेश आहे. या कामगार वर्गाला साधारणपणे दोन महिन्यांचा पगार दिवाळी सणासाठी बोनस म्हणून दिला जात होता. त्याची सरासरी रक्कम प्रति कामगार वीस हजार होत होती. या सर्वांना दिवाळीसाठी १५० कोटी रुपयांची रक्कम बोनस म्हणून मिळत असे. मात्र, गेले वर्षभर असलेल्या
आर्थिक मंदीमुळे कापडाचे
उत्पादन कमी झाले. पर्यायाने कामगारांच्या वेतनामध्ये सुद्धा घट झाली. आणि मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या यंत्रमागधारकांनी कामगारांना काही ना काही मिळावे, यासाठी साधारणपणे एक महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्याची तरतूद केली आहे. साधारणत: ही रक्कम ७५ ते ८० कोटी रुपये होते. बोनसमध्ये घट झाल्यामुळे साहजिकच बाजारामध्ये त्याचा परिणाम दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने ओस
दीपावली सणासाठी प्राधान्यक्रमाने फराळाचे पदार्थ घरी करावे लागतात, यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून किराणा भुसारी मालाच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
तर त्या पाठोपाठ तयार कपडे घेण्याबरोबर दीपावली सणासाठी लागणारे अन्य साहित्य तेही गरजेनुसार खरेदी केले जात आहेत. अशा स्थितीत दूरदर्शन संच, मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुकाने व हॉटेल ओस पडली आहेत.


कापड उत्पादनात घट
दीपावली सणानंतर साधारणत: आठवडाभराने यंत्रमाग कारखाने सुरू होत असत. मात्र, पुढे कापडाला गिऱ्हाईक नसल्यामुळे कारखाने लवकर सुरू होण्याबाबत शंका व्यक्त होत आहे. त्याचबरोबर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी २७ नोव्हेंबरला मतदान असल्यामुळे त्याचा परिणाम कारखाने चालू करण्यावर होणार आहे.

Web Title: Due to a downturn in the clothing market,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.