जलतरण तलावात बुडून मुलाचा मृत्यू वारणानगर येथे घटना : प्रशिक्षकास चोप; हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप
By admin | Published: May 9, 2014 12:35 AM2014-05-09T00:35:27+5:302014-05-09T00:35:27+5:30
नवे पारगाव : बिरदेवनगर पारगाव (ता. हातकणंगले) येथील वरुण वसंत मोरे (वय ११) याचा वारणानगर येथील शिक्षण मंडळाच्या जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाला.
नवे पारगाव : बिरदेवनगर पारगाव (ता. हातकणंगले) येथील वरुण वसंत मोरे (वय ११) याचा वारणानगर येथील शिक्षण मंडळाच्या जलतरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाला. वरुणचा मृत्यू प्रशिक्षक उदय पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचा आरोप त्याच्या आई-वडिलांनी केला आहे. घटनेची नोंद कोडोली पोलिसांत झाली आहे. वरुणच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी प्रशिक्षकाची चांगलीच धुलाई केली. याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, वरुण हा वारणानगरच्या इंग्लिश अॅकॅडमीत तिसरी उत्तीर्ण झाला आहे. उन्हाळी सुटी असल्याने नवे पारगावचे कराटे प्रशिक्षक उदय शामराव पाटील (वय ३५) याच्या समर प्रशिक्षण कॅम्पसाठी वरुण दाखल झाला होता. पारगावच्या वारणा निकेतनमध्ये उदय पाटील याने प्रशिक्षण कॅम्प सुरू केला होता. बुधवारी दुपारी ३२ मुलांना घेऊन उदय पाटील वारणेच्या जलतरण तलावामध्ये गेला होता. प्रशिक्षण देऊन मुलांना घेऊन तो पारगाव येथे सायंकाळी झाला. पारगावमध्ये आल्यानंतर वरुण सोबत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने वरुणची शोधाशोध सुरू केली. टँकजवळ येऊन पाहिले असता तेथे त्याचे कपडे आढळले. बंदिस्त इमारतीतील गढूळ पाणी आढळल्याने वरुणचा पाण्यात शोध लागेना. त्यामुळे पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू केला. तथापि, निर्गतीकरणाची छोटी व्यवस्था असल्याने पाणी लवकर कमी झाले नाही. बिरदेवनगरच्या तरुणांनी शोधाशोध सुरू केल्यावर रात्री उशिरा वरुणचा मृतदेह जलतरण तलावामध्ये आढळला. वरुणच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संतप्त झालेल्या जमावाने प्रशिक्षक उदय पाटील याची चांगलीच धुलाई केली. जलतरण तलावाजवळ पोहायला शिकणार्यांसाठी बचाव यंत्रणेची कोणतीही सुविधा नसल्याने जमावाने शिक्षण मंडळाची खरडपट्टी काढली. वरुणचे चुलते मारुती मोरे यांनी कोडोली पोलिसांत फिर्याद दिली. कोडोली उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. मध्यरात्रीनंतर वरुणवर अंत्यसंस्कार झाले. एकुलत्या मुलग्याच्या मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला. दरम्यान, पोलिसांनी उदय पाटील यास ताब्यात घेतले आहे. स. पो.नि. शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीकांत शिंदे व पडवळ तपास करीत आहेत. (वार्ताहर)