उत्खननामुळे शेतकरी, वीट व्यावसायिकांची पंचाईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:06 AM2018-03-19T00:06:38+5:302018-03-19T00:06:38+5:30
संतोष बामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ नका, असा आदेश शेतकºयांना प्रांताधिकारी यांनी दिला आहे.
त्यामुळे आपल्या सात-बारापत्रकी चढलेला बोजा कमी करण्यासाठी शेतकºयांची घाई सुरू झाली आहे, तर दुसरीकडे वीट भट्टीवरील वीट उचलू न देण्याच्या आदेशाने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.
माती उत्खननप्रश्नी उदगाव-चिंचवाडच्या ७६ शेतकºयांच्या सात-बारावर सुमारे साडेबारा कोटींचा दंड चढविण्यात आला आहे, तर गेल्या तीन महिन्यांपासून उदगाव-चिंचवाडमधील असलेल्या वीट भट्ट्यांवरून विटाची विक्री होत होती, तर बुधवारी शिरोळ येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी एकही वीट व्यावसायिकांना उचलू देऊ नका अशा आदेशाने खळबळ उडाली आहे.
तर शुक्रवारी उदगाव-चिंचवाडच्या सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन सर्व वीटभट्ट्यांच्या समोरील रस्त्यात जेसीबीच्या साहाय्याने चर काढून रस्ता बंद केला आहे. उदगाव व चिंचवाड परिसरात सुमारे दीडशेहून अधिक वीटभट्ट्या आहेत. या वीटभट्ट्यावर कोट्यवधी रुपयांचा विटाचा मुद्देमाल आहे. सर्व शेतकºयांनी एकत्रित येऊन वीट वाहतूक बंद केल्याने वीट व्यावसायिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे. शेतकरी आपली बाजू सोडविण्यासाठी आता कोणत्याही स्तरावर जाण्याच्या तयारीत आहेत. माती उत्खनन व वीटभट्ट्यांमुळे निसर्गरम्य वातावरण पूर्णत: गायब झाले आहे. या कारवाईचे निसर्गप्रेमींकडून स्वागत होत आहे. उदगाव-चिंचवाड माती उत्खनन करण्यासाठी रितसर रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांनाही पाच ते सहापट दंड झाला आहे. हा दंड कमी करण्यासाठी तहसीलदारांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही. तसेच रितसर आदेशानुसार कारवाई केली आहे. त्यामुळे रॉयल्टी भरलेल्या शेतकºयांचा कळीचा मुद्दा बनला असून आता जिल्हाधिकाºयांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.