कारवाईच्या भीतीने ‘त्या’ पोलिसांचे धाबे दणाणले
By admin | Published: November 4, 2014 01:01 AM2014-11-04T01:01:40+5:302014-11-04T01:03:48+5:30
विठ्ठलाला साकडे : राजकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याच्या हालचाली फोल
कोल्हापूर : गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे मारहाणप्रकरणी कारवाईच्या भीतीने ‘त्या’ तिघा पोलिसांचे धाबे दणाणले आहेत. राजकीय दबाव टाकून प्रकरण दडपण्याच्या हालचाली फोल ठरल्याची चर्चा दबक्या आवाजात आज, सोमवारी दिवसभर पोलीस दलात सुरू होती. बचाव करण्यासाठी तिघांपैकी एका कॉन्स्टेबलने थेट विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूर गाठल्याची चर्चा आहे.
थोडगे मारहाण प्रकरणात पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी केलेल्या तपासामध्ये ते तिघे पोलीस दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तब्बल पाच महिन्यांनी हे प्रकरण पुन्हा पुढे आल्याने संपूर्ण पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. कारवाईच्या भीतीने आज दिवसभर त्या पोलिसांनी आपले मोबाईल उचलण्याचे धाडस केले नाही, तर एकाने थेट विठ्ठलाची भेट घेण्यासाठी पंढरपूर गाठल्याची चर्चा आहे. सुमित पाटीलसह आणखी दोघांचा समावेश असलेल्या कॉन्स्टेबलमध्ये एकजण गगनबावडा पोलीस ठाण्याकडून, तर दुसरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून करवीरमध्ये रुजू झाला असल्याचे समजते.
थोडगे मारहाण प्रकरणाची यापूर्वी पत्रकारांनी विचारणा केली असता तपास पूर्ण होऊन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्याकडे अहवाल सादर केल्याचे पोलीस उपअधीक्षक किसन गवळी यांनी सांगितले होते. त्यानुसार डॉ. शर्मा यांच्याकडे चौकशी केली असता अहवाल माझ्याकडे आलाच नसल्याचे त्यांनी सांगितले. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बोलण्यातील तफावतीमुळे अहवालाबाबत चालढकल होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होऊ लागल्या. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. शर्मा यांनी आपल्याकडे अहवाल दोन दिवसांत सादर होईल. त्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असा विश्वास पत्रकारांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्णाचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)