भीतीमुळेच भाजपचा अध्यक्ष बदलास नकार : जिल्हा परिषदेचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:14 AM2018-05-13T00:14:44+5:302018-05-13T00:14:44+5:30
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत काहीही करून काँग्रेस-राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी सरसावलेला भाजप जिल्हा परिषदेत मात्र अध्यक्ष बदल करायचा झाल्यास सत्ताबदल होईल, या भीतीमुळेच अध्यक्ष सोडून अन्य पदाधिकारी बदलास कसातरी तयार झाला आहे. त्यामागे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध (गोकुळ) संघातील सत्ताकारणाचेही संदर्भ आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व कोल्हापूरचे महापौरपद हे विधानसभा निवडणुका जिंकण्यास महत्त्वाची सत्तास्थाने असल्याने, ती काहीही करून आपल्याच ताब्यात राहिली पाहिजेत, यासाठी हा सगळा आटापिटा आहे.
भाजपच्या पुढाकाराने जेव्हा जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सुनेचे नाव पुढे आल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीकडून टोकाचा विरोध होईल, म्हणून ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांचे नाव भाजपने पुढे आणले; परंतु इंगवले यांच्यासाठी जोडण्या करायच्या कुणी व आर्थिक ताकद वापरायची कुणी, असा प्रश्न तयार झाल्यावर महादेवराव महाडिक यांच्याकडे भाजपने सगळी सूत्रे दिली.
महाडिक यांनाही मागच्या सभागृहात मुलगा अमल यास आमदार सतेज पाटील यांनी अध्यक्ष होण्यापासून रोखल्याचा राग होता व त्याचा वचपा काढण्यासाठी काहीही करून शौमिका महाडिक यांना अध्यक्ष करायचे होते. महाडिक यांनी एकदा सूत्रे हातात घेतल्यावर ते सगळ्या जोडण्या लावणार हे गृहीतच होते आणि घडलेही तसेच; परंतु त्यांना ही सत्ता देताना अध्यक्षांसह सर्वच पदाधिकारी सव्वा वर्षात बदलण्याचा निर्णय सर्वच नेत्यांच्या पातळीवर झाला होता. त्यांनी महापालिकेत तीन-तीन महिन्यांनी महापौर बदलले आहेत; कारण ‘ते सांगतील तो महापौर’ अशी स्थिती तिथे असे; परंतु जिल्हा परिषदेत ती स्थिती नसल्याने भाजपलाच ते नको आहे.
‘गोकुळ’च्या राजकारणात महाडिक यांच्याबरोबर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील यांचे पाठबळ मोठे आहे. त्यामुळे इतर पक्षीय राजकारणात काही झाले तरी ‘गोकुळ’मध्ये मात्र हे एकमेकांना सोडायला तयार नाहीत. आता अध्यक्षही बदलायचा झाल्यास काँग्रेसकडून पुन्हा पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल यांचेच नाव पुढे येणार, हे स्पष्टच आहे. तसे झाल्यास ‘गोकुळ’मधील सत्तामैत्रीमुळे महाडिक गटाकडून पी. एन. यांच्या मुलग्यास अध्यक्ष करण्यासाठी पडद्याआडून मदत केली जाईल, अशी भीती भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.
जिल्हा परिषदेतील दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ सदस्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. आमदार सतेज पाटील यांनी गेल्या निवडणुकीतच महाडिक-पी. एन. यांच्या पॅनेलला घाम फोडला होता.
त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनीच सत्तारूढ आघाडीला मदत केल्यामुळे त्यांचे पॅनेल निवडून येऊ शकले. पुढील निवडणुकीत सतेज-मुश्रीफ यांचे पॅनेल रिंगणात असणार हे स्पष्टच आहे. अशा स्थितीत पी. एन. आपल्यासोबत राहणे हे महाडिक यांच्या दृष्टीने व ‘गोकुळची सत्ता टिकवण्याच्या दृष्टीनेही महत्वाचे आहे. त्यामुळे गोकुळ’च्या सत्तेत बांधून घेण्यासाठी महाडिक जिल्हा परिषदेत काहीही करू शकतात व ते घडू नये यासाठीच अध्यक्ष सोडून अन्य पदाधिकारी बदल असा फॉर्म्युला पुढे आणला आहे.
कर्नाटक निकालानंतर हालचाली
साऱ्या देशाचे लक्ष आता १५ तारखेला होणाºया कर्नाटकच्या निकालाकडे लागले आहे. भाजपच्या दृष्टीनेही या राज्यातील सत्ता लाखमोलाची आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत काही घडामोडी होतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
‘हम पाँच’
सत्तारूढ भाजप व दोन्ही काँग्रेसकडे समान संख्याबळ झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन, आवाडे गटाचे दोन व अपक्ष रसिका पाटील एक अशा पाच सदस्यांच्या हातांत जिल्हा परिषदेत सत्ता कुणाची याचा निर्णय आला होता; परंतु पुढच्या राजकारणात ‘स्वाभिमानी’चे नेते खासदार राजू शेट्टी हे भाजपच्या विरोधात गेले आहेत. आवाडे हे सत्तेबरोबर राहूनही अस्वस्थ आहेत. अपक्ष रसिका पाटील या मूळच्याच काँग्रेस विचाराच्या आहेत. त्यामुळे बदल करताना यांचा पाठिंबा शंभर टक्के गृहीत धरता येणार नाही, याचीही भीती भाजपला वाटत आहे व त्यात नक्कीच तथ्य आहे.