नदीपात्रातील भरावामुळे शेतजमिनी गेल्या वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:54+5:302021-06-30T04:15:54+5:30
कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवर कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी नदीपात्रात टाकलेल्या मुरुमाच्या ...
कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीवर कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणाऱ्या पुलाच्या कामासाठी नदीपात्रात टाकलेल्या मुरुमाच्या भरावामुळे टाकळी हद्दीतील मोठ्या प्रमाणात शेतजमीन वाहून गेली आहे. जमिनीबरोबर विद्युत मोटारीही वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणाऱ्या टाकळी आणि चंदूर गावच्या सीमेवर नवीन पुलाचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक अडचणीमुळे बंद असलेले पुलाचे काम सुरू झाले आहे. पिलरच्या कामासाठी चंदूरच्या बाजूला नदीपात्रात सुमारे पाच फुटापेक्षा अधिक मुरुमाचा भराव टाकला आहे. त्यामुळे पात्रातील पाण्याचा प्रवाह टाकळी गावच्या बाजूने झाल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर नदीकाठची शेतजमीन मोठ्या प्रमाणात कातरली आहे. त्यामुळे नदीचे पात्रच बदलले असून नदीकाठी असलेले विद्युत मोटारीही वाहून गेल्या आहेत. याचा फटका येथील अनेक शेतकऱ्यांना बसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनस्तरावर या नुकसानीचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून होत आहे.
फोटो - २९०६२०२१-जेएवाय-०४
फोटो ओळ - सैनिक टाकळी येथील पुराच्या प्रवाहाने कृष्णा नदीच्या काठची जमीन वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.