देय मुद्रांक शुल्कावरील दंड झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 12:10 PM2019-03-09T12:10:04+5:302019-03-09T12:11:10+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारा दंड १० ...
कोल्हापूर : महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदीनुसार आकारणीयोग्य असलेल्या मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार लागू होणारा दंड १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी येथे दिली.
मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय दंड कमी करण्याकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी १ मार्च २०१९ ला प्रसिद्ध झाल्यापासून पुढे सहा महिने चालू राहील. या आदेशान्वये दंड कपातीची सवलत ३१ डिसेंबर २०१८ पूर्वीच्या किंवा त्यापूर्वीच्या दस्तांना लागू असेल. बरेच लोक मालमत्तेचे व्यवहार १00 रुपयांच्या स्टॅम्पवर करतात; परंतु प्रत्यक्षात त्या मालमत्तेचे मूल्यांकन एक लाख असते.
नियमानुसार त्यास सहा हजार मुद्रांक शुल्क भरावा लागतो; त्यामुळे त्या व्यक्तीस पाच हजार ९०० रुपये दंड भरावा लागे. तो दंड त्याने ज्या दिवशी स्टॅम्प केला, तेव्हापासून लागू होत असे. या दंडाच्या रकमेतील ९० टक्के रक्कम माफ करण्याची ही योजना आहे.
निवासी वापराच्या प्रयोजनार्थ, स्थावर मालमत्तेच्या भाडेदारीच्या हस्तांतरणाच्या संबंधातील करार, शहर आणि विकास औद्योगिक विकास महामंडळ, म्हाडा व त्यांची विभागीय मंडळे यांच्या निवासी किंवा अनिवासी युनिटे वाटप, हस्तांतरण किंवा विक्रीचे अभिहस्तांतरणपत्र, झोपडपट्टीधारकाला वाटप केलेल्या निवासी-अनिवासी वाटप अभिहस्तांतरणपत्र आणि त्यानंतरचे हस्तांतरण, महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकाबाबत अभिहस्तांतरणाकरिता जी पात्र आहेत, ज्यांचे मानीव अभिहस्तांतरण प्रलंबित आहे, अशी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थामधील निवासी घटक वाटप किंवा अभिहस्तांतरणाचे किंवा विक्रीचे अभिहस्तांतरणपत्र यांना ही सवलत लागू आहे.
योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जाचा नमुना सहजिल्हा निबंधक वर्ग-१ कोल्हापूर यांच्या कार्यालयात उपलब्ध असून, या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.