कोल्हापूर जिल्ह्यात दाट धुक्यासह दवाचा वर्षाव, आंबा मोहरासह वेलवर्गीय पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 06:21 PM2018-03-05T18:21:10+5:302018-03-05T18:21:10+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस दाट धुक्याच्या झालरीसह दव मोठ्या प्रमाणात पडत आहे. पहाटेपासून पसरलेले धुके सकाळी साडेनऊपर्यंत राहत आहे. अशा वातावरणाने आंबा मोहरासह वेलवर्गीय पिके धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. यंदा फेबु्रवारीपासूनच तापमान वाढत गेले आणि शेवटच्या आठवड्यात तर पारा चांगलाच वाढला; पण गेले दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला असून, पहाटेपासून दाट धुक्याची झालर पाहावयास मिळत आहे.
दाट धुक्याबरोबर बारीक-बारीक दवाचा वर्षावही झाला. ऐन कडाक्याच्या थंडीत जसे दाट धुके पसरते त्यापेक्षाही अधिक धुके पडत आहे. सोमवारी सकाळी तर अगदी फुटावरील दिसणे अवघड झाले होते. त्यामुळे वाहनांना रस्त्यावरून जाताना कसरत करीतच पुढे जावे लागत होते.
सकाळी साडेनऊपर्यंत धुक्याची झालर बाजूला होत नाही. धुके आणि अंगाला झोंबणारे वाऱ्याचा त्रास नागरिकांना होत असून वयोवृद्धांना तर घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. सोमवारी सकाळी साडेनऊनंतर सूर्यनारायणाने हळूहळू दर्शन दिले, दिवसभर ऊन राहिले; पण उन्हाचा चटका कमी झालेला दिसला.
जिल्ह्याच्या तापमानात घसरण झाली असून, रविवारी कमाल तापमान ३२ तर सोमवारी ते ३५ डिग्रीपर्यंत राहिले. आगामी दोन दिवस धुके पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून बुधवारनंतर तापमानात वाढ होत जाईल.
धुक्यासह पडलेल्या थंडीने आंब्यांचा मोहर गळण्याची भीती आहे. मोहर गळती होईल; पण जो मोहर राहील, त्याच्या फलधारणेवर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर दोडका, काकडी, कलिंगडे या वेलवर्गीय पिकांसह भाजीपाल्यालाही या वातावरणाचा फटका बसणार आहे.
धुक्यामुळे अपघात वाढले
दाट धुके आणि त्यातील बारीक-बारीक दवामुळे निसरडा झालेला रस्ता म्हणजे अपघाताला निमंत्रणच असते. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात झाले आहेत.
रुग्णसंख्येत वाढ
कडक उष्म्यानंतर एकदम थंडी पडल्याने त्याचा थेट परिणाम आरोग्यावर झाला आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ झालेली दिसते.
धुक्यामुळे विद्युत पुरवठा खंडित
दाट धुके आणि दवामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी पहाटेपासून वीज पुरवठा खंडित झाल्याच्या घटना घडल्या. तीन-चार तासांनंतर पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत झाला.