महापुराच्या जोरदार तडाख्याने गूळ हंगाम आला अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:22 AM2019-08-19T00:22:08+5:302019-08-19T00:22:22+5:30
राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुºहाळघरेही ...
राजाराम लोंढे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याची झळ सर्वच क्षेत्रांना बसली असून यातून गुºहाळघरेही सुटलेली नाहीत. नदी, ओढ्यांच्या काठचे उभे ऊसपीक कुजल्याने गाळपासाठी ऊस आणायचा कोठून? त्यात गुºहाळघरे व जळणाचे मोठे नुकसान झाल्याने आगामी हंगाम सुरू कसा करायचा, असा पेच गुºहाळमालकांसमोर आहे. त्यामुळे या हंगामात सव्वादोन लाख क्विंटल गुळाचे उत्पादन घटेल, असा अंदाज वर्तविला
जात आहे.
कोल्हापूरच्या गुळाची देशात ख्याती आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी येथे गुळाची बाजारपेठ वसविली आणि शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून दिले. यंदा अतिवृष्टी व महापुराने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना याचा फटका बसला असून, त्यामुळे उसाचे उत्पादन कमी होणार आहे. कृषी विभागाच्या अंदाजानुसार ७५ हजार हेक्टरांवरील ऊसपीक पुराच्या पाण्याखाली सापडले असून, यापैकी २२ हजार हेक्टर ऊस गुºहाळघराकडे येतो. त्यामुळे आगामी हंगामात किमान सात लाख गूळ रव्यांचे (३० किलो) उत्पादनाला फटका बसेल, असा अंदाज आहे. त्याचबरोबर गुºहाळघरांचीही पडझड झाली असून, जळणाच्या गंज्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने हंगाम कसा सुरू करायचा, असा पेच आहे.
उत्पादनाबरोबर प्रतीला फटका
गुळाचे उत्पादन घटणार आहेच; त्याशिवाय पुरात सापडलेल्या उसामुळे गुळाची गोडी आणि रंगावर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे.
चिखली परिसरातील चिमण्या थंडावणार
प्रयाग चिखली, वडणगे, वरणगे, निगवे दुमाला, पाडळी बुद्रुक परिसरांत सर्वाधिक गुºहाळघरे आहेत; पण महापुराने ऊसपीक उद्ध्वस्त झाल्याने यंदा या भागातील गुºहाळघरांच्या चिमण्या पेटण्याची शक्यता धूसर बनली आहे.