मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 01:19 AM2019-07-12T01:19:38+5:302019-07-12T01:21:18+5:30
चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात आज, शुक्रवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर ठेवण्यात आली आहे. दरम्यान, पंचगंगेचे पाणी राजाराम बंधाऱ्याजवळील इशारा पातळीकडे वेगाने वाढत असून, रात्री उशिरापर्यंत ७५ हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे चंदगड, आजरा, गडहिंग्लज, भुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, पन्हाळा तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शाहूवाडीत १४ घरांच्या भिंती कोसळल्या
मलकापूर : परिसरातील कडवी नदीला आलेल्या पुरामुळे पेरीड, खोतवाडी बंधारा पाण्याखाली गेला आहे. तालुक्यातील १४ गावांतील घरांच्या भिंती पडल्या आहेत. ५४ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
कडवी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची भात, ऊसशेती पाण्याखाली गेली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. पावसामुळे बांबवडे आरोग्य केंद्राची संरक्षण भिंत पडली आहे. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर गोगवे, करंजोशी येथे वडाची झाडे पडली आहेत. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे. कडवी, शाळी, कासारी, वारणा नद्यांच्या पाण्याची पातळी वाढून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. पेरिड, खोतवाडी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
कृष्णा नदीत मृत माशांचा खच
नृसिंहवाडी : पावसाने जोर धरल्याने कृष्णा नदीला पूर येऊन पाणी पात्राबाहेर पडली आहे. गुरुवारी पहाटेपासून नृसिंहवाडी-औरवाड पुलाच्या दोन्ही बाजूस मृत माशांचा खच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याच पुलावर नेहमी मासे पकडण्यासाठी येणारे मच्छिमार या मृत माशांच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. मासे कुजलेले असल्याने ते पकडण्याचा प्रयत्न कोणी केला नाही.
मृत माशांत कटार्ना, खिलाफ, वाम, मरळ आदी जातीचे दहा किलो वजनापर्यंतचे मासे तरंगताना दिसत आहेत. हे मासे कशाने मृत झाले हा संशोधनाचा विषय आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणावर नियंत्रण ठेवून असते, हेच या नदीकाठच्या जनतेला समजेनासे झाले आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर नदीपात्रात पावसाच्या पाण्यासोबत कारखान्याचे दूषित पाणी, औद्योगिक वसाहतीमधून येणारे केमिकलयुक्त पाणी या सर्व घटकाने नदीतील मासे मृत होण्याच्या घटना घडत असतात. मात्र, साध्या कारवाईचे फार्ससुद्धा आजपर्यंत कुठल्या कारखान्यावर झाल्याचे दिसून येत नाही. मोठ्या प्रमाणात मासे कोणत्या कारणाने मेले याचा शोध घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
पश्चिम पन्हाळ्यात जोर कायम; नद्यांना पूर
कळे : संततधार पावसामुळे पश्चिम पन्हाळ्यासह धामणी खोºयातील नद्यांचे पाणी पात्राबाहेर गेले असून, विभागातील नद्यांवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. परखंंदळे-गोठे पुलावर पुराचे पाणी वाढत असल्याने रस्ता बंद केला आहे. त्यामुळे धामणी खोºयातील गोठे, तांदूळवाडी, आकुर्डे, आंबर्डे, आदी गावांचा दळणवळणाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे कळे-सावर्डे, गोठे-परखंदळे, सुळे-आकुर्डे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. तीन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे. मात्र, भात रोप लावणी, भुईमूग, नाचणी या पिकांना पोषक असाच पाऊस सुरू आहे.
संततधार पावसामुळे नद्यांना पूर; घरांची पडझड
पन्हाळा : संततधार पावसामुळे कुंभी, धामणी, कासारी नद्या दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक बंधारे पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे घरांची पडझड झाली आहे. नद्यांना पूर आला असून, कासारी नदीवरील करंजफेण, कांटे, पेंडाखळे, बाजारभोगांव, वाळोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपण व यवलूज हे आठ, धामणी नदीवरील सुळे व आंबर्डे हे बंधारे पाण्याखाली गेले. माजगाव पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक कसबा ठाणेमार्गे सुरू आहे. कासारी धरणात १.७५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
तुळशीच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ