अतिवृष्टी व ओढ्याच्या प्रवाहामुळे साडेचार एकर शेती गेली तुटून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:24 AM2021-07-27T04:24:22+5:302021-07-27T04:24:22+5:30
कुंभारवाडी-चोरवाडीदरम्यान चोरपाचामाळ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शिवारात गट नंबर ४७० मध्ये अशोक रामचंद्र पाटील यांची भात व ऊस पिकाची शेती ...
कुंभारवाडी-चोरवाडीदरम्यान चोरपाचामाळ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शिवारात गट नंबर ४७० मध्ये अशोक रामचंद्र पाटील यांची भात व ऊस पिकाची शेती आहे. या शेतीला लागूनच उत्तरदक्षिण पाण्याचा ओढा वाहतो.
चार दिवसांपूर्वी राधानगरी तालुक्यात न भूतो अशी अतिवृष्टी झाली. परिणामी ओढे, नदी, नाले तुडुंब भरून वाहू लागले. अतिवृष्टीमुळे पाण्याला प्रचंड प्रमाणात वेग होता. परिणामी भूस्खलनाबरोबरच ओढे, नदी, नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलली.
दरम्यान, दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्याचे पात्रच बदलल्याने ओढ्याच्या शेजारी असणाऱ्या अशोक रामचंद्र पाटील यांच्या शेतात ओढा शिरला. ओढ्याच्या पाण्याला अतिवेग असल्याने भाताचे पीक लागवड केलेली शेतीच अक्षरश: तुटून गेली. दोनशे ते अडीचशे फूट लांबी व ३५ ते ४० फूट खोलीमुळे या शेतीला दरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन्ही ठिकाणी मिळून साडेचार एकर शेती तुटून गेल्याने २५ लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. तत्काळ घटनेचा पंचनामा करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी अशोक पाटील यांनी केले आहे.
ओढ्याचे पात्रच बदलल्याने तुटून गेलेल्या शेतीचे दृश्य अतिशय भयावह आहे. पस्तीस-चाळीस फूट जमीनच तुटून गेल्याने शेताला दरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
----------- सोबत दोन फोटो -------------- अतिवृष्टी व ओढ्याच्या प्रवाहामुळे तुटून गेलेल्या शेतजमिनीचे विदारक चित्र.
छाया / रमेश साबळे