उच्चांकी दरामुळे गुऱ्हाळमालक सुखावल
By admin | Published: February 13, 2015 12:29 AM2015-02-13T00:29:49+5:302015-02-13T00:46:08+5:30
हंगाम अंतिम टप्प्यात : सरासरी दरात घट; काही कलमांना चांगला दरे
सहदेव खोत - पुनवत -शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील वारणा पट्ट्यातील गुऱ्हाळघरात उत्पादित गुळाची कलमे दरात आता उभारी घ्यायला लागली असून, गुळाचा सरासरी दर जरी कमी असला तरी, काही कलमांना चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी आता गुऱ्हाळ उद्योग फायद्याचा ठरू लागला आहे. बुधवारी शाहूवाडी तालुक्यातील मालेवाडी येथील बळी सखाराम पाटील यांच्या गुळाला हंगामातील आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिक्विंटल ६५०० रुपये दर मिळाला. या गुळाचा सौदा कऱ्हाड येथील उत्तमराव जाधव (भाटवडेकर) यांच्याकडे पार पडला, तर अन्य काही कलमांना ५००० ते ६०१० पर्यंत दर मिळाला.
शिराळा व शाहुवाडी तालुक्यातील गुऱ्हाळ हंगाम आता अंतिम टप्प्याकडे चालला आहे. शेतकरी मोठे व छोटे रवे याच्या रूपात बाजारपेठेत गूळ पाठवत आहेत. या हंगामात गुळाला सरासरी चांगला दर मिळालेला नाही, हे शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे आहे. मात्र गुळाला कमी-अधिक दर का मिळतो, याबाबत शेतकऱ्यांना फारसे आही माहीत नसते. होईल तसा गूळ तयार करून तो बाजारपेठेत पाठविणे एवढेच त्यांना माहीत असते.
यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या गुळाला सरासरी ३००० ते २५०० च्या आसपास दर मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. मात्र दुसरीकडे गेल्या महिन्याभरात अनेक शेतकऱ्यांच्या गुळाला काही कलमांना चार हजार ते सहा हजारांवर दर प्राप्त झाला आहे.
नुकत्याच कऱ्हाड बाजारपेठेत भाटवडेकर यांच्याकडे झालेल्या गूळ सौद्यात मालेवाडीच्या बळी पाटील यांच्या गुळाला पाच कलमांना ५००० ते ६५०० इतका प्रतिक्विंटल दर मिळाला, तर कोतोलीच्या भीमराव शिंदे यांच्या गुळाला ४१४० इतका दर प्राप्त झाला. त्यांना या गळितापासून नफा झाल्याचे दिसून येत आहे.
असा ठरतो दर...
गुळाचा दर रंग, चव व कणी यावर ठरत असतो. एकाच शेतातील उसापासून बनविलेल्या गुळाचा रंग, चव, कणीमध्ये वापरलेली रसायने, उसाची जात, आदण शिजविण्याची पध्दत व गुळव्याचे कसब यामुळे फरक पडतो. कठीणपणा, चांगली चव व चांगला रंग असलेल्या गुळालाच चांगला दर मिळतो. गूळरव्यांच्या वेगवेगळ्या कलमांना वेगवेगळा दर मिळतो.