अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवा ‘सलाईन’वर

By admin | Published: September 22, 2014 10:25 PM2014-09-22T22:25:14+5:302014-09-23T00:14:37+5:30

बांबवडे आरोग्य केंद्र : दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असताना एकही कायमस्वरूपी अधिकारीनाही

Due to inadequate staff, the patient services 'saline' | अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवा ‘सलाईन’वर

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णसेवा ‘सलाईन’वर

Next

रामचंद्र पाटील - बांबवडे -शाहूवाडी तालुक्यातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या बांबवडे येथील आरोग्य केंद्रातील चांगल्या रुग्णसेवेमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे व हे केंद्र गोरगरीब लोकांसाठी तारणहार बनले आहे. परंतु, अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे रुग्णांना अधिक चांगल्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
बांबवडे आरोग्य केंद्रांतर्गत ३१ गावे व वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. एक केंद्र व एवढ्या गावांच्या संख्येमुळे या आरोग्य केंद्रात रुग्णांची नेहमीच गर्दी असते. साधारणपणे १२५ ते १७५च्या दरम्यान रुग्ण दररोज येत असतात. आठवडी बाजार गुरुवार दिवशी तर रुग्णालयात उभा राहण्याससुद्धा जागा नसते आणि अशी परिस्थिती असतानाही येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. याचा परिणाम म्हणून रुग्णांना सकाळी पाच वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागते. लोकांना येथे मिळणाऱ्या चांगल्या सुविधा त्याही खिशाला परवडणाऱ्या म्हणून लोक सर्व त्रास सहन करीत आहेत.
या केंद्रात कायमस्वरूपी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या येथे एकाही कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक नाही. तात्पुरती सुविधा म्हणून माण प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पी. पी. कुंभार यांना जवळपास एक वर्षापासून येथील पदभार दिला आहे. परंतु, दोन डॉक्टरांची आवश्यकता असताना एकाच डॉक्टराला १५० हून अधिक रुग्णांना वैद्यकीय उपचार देताना तारेवरची कसरत करावी लागते. यासह जिल्हा व तालुक्याच्या बैठका, इतरही प्रशासकीय कामकाज पाहावे लागते. अशावेळी सरुड येथील पथकातील डॉक्टरांना पाचारण करावे लागते.
या केंद्रांतर्गत साळशी, सुपात्रे, पिशवी, कापशी, सौते, थेरगाव, गोगवे, शित्तूर ही उपकेंद्रे व सरुड येथील पथकाचा कारभार चालतो. सध्या येथे एक वैद्यकीय अधिकारी, तीन आरोग्य सहायक, औषधनिर्माता, एक आरोग्यसेविका, एक लिपीक, तीन परिचर, एक चालक व एक लॅब टेक्नीशियन अशी पदे कार्यरत आहेत, तर दोन वैद्यकीय अधिकारी, परिचर दोन, एक आरोग्य सहायिका आणि उपकेंद्रामध्ये नऊ आरोग्यसेवक व सेविका अशी पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यात अव्वल
बांबवडे आरोग्य केंद्राला महिला प्रसूतीचा जिल्ह्याचा सलग तीनवेळा प्रथम क्रमांक व राज्याचा सलग दुसऱ्यांदा दुसरा क्रमांक मिळाला. अगदी थोडक्या गुणात गतवर्षाचा राज्याचा पहिला क्रमांक हुकला. तो मान पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरला मिळाला.

शासनाकडे पाठपुरावा
तालुका वैद्यकीय अधिकारी व स्थानिक प्रशासन यांनी वैद्यकीय अधिकारी पदे भरण्यासंदर्भात जिल्हा व राज्य पातळीवर लेखी मागणीद्वारे पाठपुरावा केला आहे. परंतु, पदे भरण्याची प्रक्रियाच कुर्मगतीने सुरू असल्याने या नवीन नियुक्त्यांना शासनाच्या अडचणी येत आहेत.

ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता
बांबवडे परिसराचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपचारादरम्यान मर्यादा येतात. अत्याधुनिक साधनसामग्री, स्वतंत्र विभाग, स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी अशा सुविधा मिळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचीच आवश्यकता आहे. यासाठी शासकीय व राजकीय पातळीवर ठोस पावले उचलली नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव धूळ खात पडला आहे.

Web Title: Due to inadequate staff, the patient services 'saline'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.