उपपदार्थ विक्री क्षमता वाढविण्यावर भर
By admin | Published: October 1, 2016 12:33 AM2016-10-01T00:33:48+5:302016-10-01T00:41:21+5:30
नवोदिता घाटगे : कागलला शाहू मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीची वार्षिक सभा
कागल : स्वर्गीय विक्रमसिंहराजेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच शाहू दूध संघाची वाटचाल सुरू आहे. आगामी काळात ग्रामीण भागातील वितरण व्यवस्था मजबूत करून तेथेच उपपदार्थ विक्रीसाठी क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन संघाच्या संचालिका नवोदिता घाटगे यांनी केले.
व्हन्नूर (ता. कागल) येथील छ. शाहू मिल्क अॅण्ड अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कंपनीचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कागल बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब भोसले, सर्व संचालक, सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवोदिता घाटगे म्हणाल्या की, ग्रामीण भागात दूध उत्पादन केले जाते. मात्र, दुग्ध पदार्थ विक्रीबद्दल किंवा वापराबद्दल जागरूकता नाही. शाहू दूध संघ यासाठी ग्राहक प्रबोधन कार्यक्रमही राबविणार आहे. सभासद, वितरक, दुग्ध उत्पादक, संस्था यांनी त्यांच्या सूचना, तक्रारी थेट कराव्यात, त्या स्वीकारल्या जातील.
समरजितसिंह घाटगे म्हणाले की, शाहू दूध संघाची सर्वच उत्पादने दर्जेदार असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. शहरात जशा पाक कला स्पर्धा, तशाच स्पर्धा ग्रामीण भागात घेऊन तेथे महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांना विक्री व्यवस्थेत सामावून घेण्यासाठी शाहू दूध संघाने पुढाकार घ्यावा.
शाहू कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते, तर उपाध्यक्ष अमरसिंंह घोरपडे यांचा सत्कार डॉ. तेजपाल शहा यांच्या हस्ते, तर नूतन संचालकांचा सत्कार राजाराम चव्हाण यांच्या हस्ते झाला. संजय पाटील यांनी स्वागत केले. कर्नल शिवाजी बाबर यांनी विषयपत्रिकेचे वाचन, राजेंद्र म्हाळूमल यांनी सूत्रसंचालन, तर संचालक युवराज पसारे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)