चौकशीच्या भीतीने ग्रामपंचायत दप्तर गायब
By admin | Published: September 12, 2015 12:21 AM2015-09-12T00:21:06+5:302015-09-12T00:52:23+5:30
आमजाई व्हरवडेतील घटना : ग्रामसेवकाचे कृत्य
सुनील चौगले ल्ल आमजाई व्हरवडे
आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) ग्रामपंचायतीच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश दिले असतानाच तत्कालीन ग्रामसेवक दीपक भोई व सदस्य मधुकर वरूटे यांनी ग्रामपंचायतीमधील कागदपत्रेच पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ग्रामस्थांना हा प्रकार कळताच त्यांनी दप्तर ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीसपाटील अशोक पाटील यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली आहे.
सविस्तर माहिती अशी, गेल्या अडीच वर्षांपूर्वी सत्ता ताब्यात घेतलेल्या वरुटे दाम्पत्याच्या कारभाराला ग्रामस्थ वैतागले आहेत. याबाबत कोणताही विकास नाही, पिण्यास पाणी नाही, असा आरोप करून आमजाई व्हरवडे येथील ग्रामस्थांनी १५ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत तीन लाखांचा हिशेब मागत सरपंचांना धारेवर धरले होते. यातूनच सरपंचांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराला कंटाळून उपसरपंचासह पाच सदस्यांनी पदाचे राजीनामे ग्रामसभेतच दिले होते, तर ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी बी. डी. नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे १ एप्रिल २०१४ ते आॅगस्ट २०१५ या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार नाईक यांनी विस्तार अधिकारी एस. पी. खोचरे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. चौकशीचा आदेश प्राप्त झाल्याने कालच खोचरे ग्रा. पं. कार्यालयात आले. मात्र, सरपंच किंवा ग्रामसेवक यापैकी कोणीही हजर राहिले नसल्याने चौकशी अधिकारी दिवसभर थांबून परत गेले. चौकशी अधिकारी कार्यालयातून बाहेर पडताच सरपंच मंदा वरुटे यांचे पती व विद्यमान सदस्य मधुकर वरुटे व तत्कालीन ग्रामसेवक दीपक भोई यांनी शिपाई साताप्पा पाटील यांच्यावर दबाव आणून सर्व रेकॉर्डच गायब केले. हे रेकॉर्ड शिरगाव येथे भोई यांच्या बहिणीच्या घरी लपवून ठेवले होते. याच दरम्यान साताप्पा पाटील याला भोई यांनी कोंडून घातले व हा प्रकार कोणाला सांगितला तर कामावरून कमी करण्याची धमकी दिली. पाटील यांनी दोन तासांनी आपली सुटका करून घेऊन गाव गाठले व सर्व प्रकार ग्रामस्थांना सांगितला. ग्रामस्थांनी पोलीसपाटील अशोक पाटील यांना घेऊन शिरगाव येथील दप्तर पंचनामा करून ताब्यात घेतले व अशोक पाटील यांनी राधानगरी पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणात नेमके काय गौडबंगाल आहे, याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.