कोल्हापूर : आवक वाढल्याने टोमॅटोचे दर गडगडले, कोथळीत उभ्या पिकात सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:44 PM2018-03-20T18:44:22+5:302018-03-20T19:41:20+5:30
टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
संदीप बावचे
जयसिंगपूर : टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादन खर्चही निघत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतेक शेतक-यांनी आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या आहेत. तर काही शेतक-यांनी टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या व शेळ्या सोडल्याचे चित्र आहे. बाजारात आवक वाढल्याने व कर्नाटकातून येणा-या टोमॅटोमुळे हे दर पडल्याचे सांगण्यात येत आहे.
शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, चिपरी, नांदणी, जैनापूर या परिसरात टोमॅटोचे पिक घेतले जाते. टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल म्हणून या गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली. परंतु सध्या टोमॅटोला अतिशय कमी बाजारभाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात दहा रुपये किलो असणारा टोमॅटो आता पाच रुपये किलो दराने विकला जात आहे.
सध्या जागेवर तीन ते चार रुपये किलो दराने व्यापा-यांकडून टोमॅटोची मागणी होत आहे. वाहतुक खर्च, काढणी खर्च याचा हिशोब घातल्यास टोमॅटोचे पिक न परवडणारे बनले आहे. त्यामुळे सध्या टोमॅटोला प्रतिकिलो एक ते दोन रुपये प्रमाणे शेतक-याला पैसे मिळत आहेत.
कोथळी (ता.शिरोळ) येथील शेतक-यांकडून आपल्या टोमॅटोच्या बागा अशाच सोडून दिल्या जात आहेत. तर समाधानकारक बाजारभाव नसल्याने तसेच वाहतुक खर्चही निघत नसल्याने काही शेतक-यांनी उभ्या पिकात शेळ्या, मेंढ्या चरावयास सोडल्या आहेत.
टोमॅटोला भाव नसल्याने सुमारे ८०० पेटी निघणारा असा एकूण २० हजार किलो टोमॅटोच्या पिकात शेळ्या, मेंढ्या चरायला सोडून दिल्या. तोडणी व वाहतुक खर्च अंगावर बसत असल्याने टोमॅटोची तोडणी बंद केली आहे. दलालांच्या संकटातून अजूनही शेतकरी सुटलेला नाही.
- कुबेर चौगुले,
शेतकरी कोथळी
दोन एकर क्षेत्रातील टोमॅटो पिक सध्या तसेच सोडून दिले आहे. कर्नाटकातून येणारा व शितगृहामुळे टोमॅटोची आवक वाढली आहे. शासनाकडे ऊस क्षेत्राबाबत माहिती असते. मात्र, टोमॅटोसह भाजीपाला पिकाची माहिती नसते. त्यामुळे सरसकट शेतकरी कमी कालावधीतला भाजीपाला पिकवितो. त्यामुळे शासनाने भाजीपाला पिकाची नोंद करावी. जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
- अनिल मगदूम,
शेतकरी कोथळी
भाजीपाला हा नाशवंत माल असल्याने वेळेत त्याची विक्री होणे गरजेचे आहे. एकीकडे औषध कंपन्या पिकाची हमी देतात तर दुसरीकडे दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.
- सुभाष पाटील,
शेतकरी