सुर्वेनगरात कचरा उठाव नसल्याने साचले ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:27+5:302021-06-09T04:29:27+5:30
कळंबा : दक्षिण विधानसभा मतदार संघातील पालिकेच्या प्रभाग क्रमांक ७९ सुर्वेनगरमध्ये कचरा उठावातील अनियमितता व तोकडे कचरा कंटेनर यामुळे ...
कळंबा : दक्षिण विधानसभा मतदार संघातील पालिकेच्या प्रभाग क्रमांक ७९ सुर्वेनगरमध्ये कचरा उठावातील अनियमितता व तोकडे कचरा कंटेनर यामुळे रस्त्याकडेला कचरा विखुरलेला आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. कचरा उठावातील अनियमिततेने डेंग्यू, मलेरिया अशा साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. कचरा उठावासाठी दोन घंटागाड्या मंजूर असून, एकाच गाडीतून कचरा उठाव सुरू आहे. सफाई कर्मचारी संख्या तोकडी असल्याने स्वच्छतेची कामे परिणामकारक होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. प्रत्येक कॉलनीत कचरा कंटेनर बसवण्यात आले नसून, फक्त बापूरामनगरमध्ये कचरा कंटेनर बसवण्यात आला आहे.
सुर्वेनगर प्रभागात लहान-मोठ्या पस्तीस कॉलन्यांचा समावेश होतो. प्रभागाची भौगोलिक रचनाही उंचसखल असल्याने गतवर्षी ऐन पावसाळ्यात निम्म्याहून अधिक प्रभागातील नागरी वस्तीत पावसाचे पाणी शिरले होते. वेळेवर कचरा उठाव होत नाही. शिवाय नागरिकांकडून नैसर्गिक नाल्यात कसाही कचरा टाकण्यात आल्याने साथीचे आजार बळावत आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व कचरा उठावाची कामे परिणामकारक व्हावीत, अशी मागणी जोर धरत आहे.
चौकट :
उपऱ्या लोकप्रतिनिधींचा विकासकामांना फटका
गेल्या चारही पालिका निवडणुकांत स्थानिक रहिवासी लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागास लाभले नाहीत. त्यामुळे नागरी समस्यांचे निर्मूलन झालेच नाही. निवडून आलेले प्रतिनिधी राहावयास शहरात असल्याने संपर्काअभावी नागरिकांची फरपट होत आहे.
फोटो : ० ७ सुर्वेनगर कचरा
सुर्वेनगरात कचरा उठाव व कचरा कंटेनरअभावी रस्त्यावर कसाही कचरा पसरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.