स्मार्टफोन नसल्याने १ लाख ९६ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:15 AM2021-07-09T04:15:46+5:302021-07-09T04:15:46+5:30
कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. ...
कोल्हापूर : सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक शाळांकडून ऑनलाईन शिक्षण देण्यात येत आहे. मात्र, नेटवर्कची अडचण, स्मार्टफोनची उपलब्धता, आदी अडचणींमुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचत नाही. विद्यार्थी, शिक्षकांसमोरील अडचणींचा वेध ‘लोकमत’ने घेतला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. गेल्या वर्षीच्या यंदा या पर्यायाने शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्या वाढली. दि. १५ जूनपासून शैक्षणिक वर्षाबरोबरच ऑनलाईन शिक्षणाची देखील सुरुवात झाली. आर्थिक स्थिती चांगली असणाऱ्या काही पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी स्वतंत्र स्मार्टफोन घेतला. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ५९० विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही. त्यात ग्रामीण भागातील १ लाख ८४ हजार ९३३, तर महापालिका परिसरातील ११ हजार ६५७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेशित झाले आहेत. यावर्षी प्रत्यक्ष वर्ग लवकर भरणार नसले, तरी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहे; पण या पद्धतीने शिक्षण घेण्याची साधने, सुविधा उपलब्ध नसणाऱ्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रत्यक्षात वर्ग भरविण्याची मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून होत आहे. (पूर्वार्ध)
पॉंईटर
आकडेवारी अशी
एकूण शाळा : ३०२७
एकूण विद्यार्थी संख्या : ३,६४,५८३
स्मार्टफोन असलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी : १,३३,४६४
स्मार्टफोन असलेले महापालिका परिसरातील विद्यार्थी : ३४,५२९
स्मार्टफोन नसलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी : १,८४,९३३
स्मार्टफोन नसलेले महापालिका परिसरातील विद्यार्थी : ११,६५७
चौकट
अशी देखील अडचण
अनेक कुटुंबांतील पालकांकडे स्मार्टफोन आहे. नोकरी, व्यवसायानिमित्त त्यांना घरातून बाहेर जावे लागते. त्यामुळे अशा कुटुंबांतील पाल्यांना स्मार्टफोन उपलब्ध होत नसल्याची अडचण आहे. त्यावर काही विद्यार्थी घराशेजारील एखाद्या वर्गमित्रासमवेत त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनद्वारे शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला देखील काही मर्यादा आहेत.
प्रतिक्रिया
ऑनलाईन शिक्षणासाठी स्मार्टफोनसह अन्य साधने उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३५ ते ४० टक्के इतकी आहे. या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून २० ते २५ विद्यार्थ्यांची बॅच करून त्यांचे प्रत्यक्षात वर्ग भरवून त्यांना शिक्षण देण्याचे नियोजन शाळांनी करावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हे आवश्यक आहे.
-प्रकाश गाताडे, अध्यक्ष, उमेद फाउंडेशन