डॉल्बी वाजला नसल्याने ध्वनिप्रदूषण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 06:38 PM2017-09-06T18:38:46+5:302017-09-06T18:47:23+5:30
कोल्हापूर : सार्वजनिक गणेशोत्सव आणि मिरवणुकीमध्ये डॉल्बी वाजला नसल्याचा सकारात्मक परिणाम यंदा ध्वनिप्रदूषण घटण्यावर झाला आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाने कोल्हापूर शहरातील विविध २२ ठिकाणी ध्वनिपातळीचे मापन केले. यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी १५ टक्क्यांनी ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले.
पर्यावरणशास्त्र विभागाने दि. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत ध्वनिपातळीचे मापन केले. यात यंदा ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले. मिरवणुकीमध्ये बिनखांबी गणेश मंदिर आणि गंगावेश येथे ध्वनीची पातळी थोड्या प्रमाणात वाढलेली दिसते. मात्र, अन्य ठिकाणी ती कमी झालेली आहे.
यावर्षीची ध्वनिपातळी ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) निश्चित केलेल्या मानकांपेक्षा वाढलेली आहे. पण, ती गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी आहे. पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. ए. एस. जाधव, एस. बी. मांगलेकर, पल्लवी भोसले, सी. एस. भोसले, विद्यार्थी अविनाश माने, विकास हरेर यांनी ध्वनिपातळी मापनाचे काम केले.
दरम्यान, ध्वनिपातळीच्या मापनाबाबत पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये कोल्हापुरातील ध्वनिप्रदूषणाची पातळी यावर्षी घटली आहे. मात्र, सीपीसीबीने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक पातळीहून ती अधिक आहे. यावर्षीच्या ध्वनिपातळीत स्टिरिओ साउंड, ढोल-ताशा, बँजो, ट्रॅक्टर, जनरेटर आणि लोकांच्या रहदारीच्या आवाजाचा समावेश आहे.
‘सीपीसीबी’च्या मार्गदर्शक सूचीनुसार कोल्हापुरातील रहिवासी, शांतता, औद्योगिक आणि व्यापारी क्षेत्र अशा सर्व ठिकाणी मोजमाप करण्यात आले. ध्वनिमापक उपकरणाद्वारे (साउंड लेव्हल मीटर) डेसिबल या एककात याचे मोजमाप केले. डॉल्बी बंदीला मंडळांनी सकारात्मक पाठबळ दिल्याने ध्वनिप्रदूषण घटले आहे. हा चांगला बदल आहे.
ध्वनिप्रदूषणाची पातळी
(डेसिबलमध्ये, मिरवणुकीदिवशी सकाळी दहा ते रात्री बारापर्यंतचे मापन)
क्षेत्र परिसर सन २०१५ २०१६ २०१७
शांतता सीपीआर ७१.८ ६७.६ ५५.६३
न्यायालय ७१.९ ६३.२ ५८.०९
जिल्हाधिकारी कार्यालय ६४.७ ६४.१ ५६.२४
शिवाजी विद्यापीठ - ५५.२ ४६.३६
निवासी राजारामपुरी ६१.२ ६२.४ ४९.१३
उत्तरेश्वर पेठ ७३.४ ६३.५ ६६.२४
शिवाजी पेठ - ६३.८ ५०.९६
मंगळवार पेठ - ७९.९ ६०.८५
नागाळा पार्क - ५८.५ ५०.९६
ताराबाई पार्क - ६१.८ ४८.२४
वाणिज्य मिरजकर तिकटी - ९६.१ ७७.७५
बिनखांबी गणेश मंदिर - ९६.५ ८४.६६
महाद्वाररोड १०३.५ ९९.५ ७१.६३
गुजरी १०३.९ ९७.७ ७४.९२
पापाची तिकटी - ९८.६ ८२.७३
राजारामपुरी - ७०.२ ६३.७२
लक्ष्मीपुरी - ६७.८ ७२.५२
शाहूपुरी - ६७.७ ५४.१३
गंगावेश - - ८५.४३
बिंदू चौक - - ७७.३६
औद्योगिक उद्यमनगर ६७.५ ६७.५ ५५.६२
वाय. पी. पोवारनगर ६७.० ६१.३ ५४.३३
‘सीपीसीबी’ची मार्गदर्शक पातळी
(डेसिबेलमध्ये, रात्रीच्या वेळी)
क्षेत्र पातळी
शांतता ४०
निवासी ४५
वाणिज्य ५५
औद्योगिक ७०