महाडिकांमुळे कोल्हापूरचा विकास दूर
By admin | Published: October 26, 2015 12:36 AM2015-10-26T00:36:01+5:302015-10-26T00:50:10+5:30
हसन मुश्रीफ : राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला सत्ता द्या
कोल्हापूर : महादेवराव महाडिक यांनी आजपर्यंत सत्तेचा दुरूपयोग फक्त मोठेपणाने मिरविण्यासाठी केला. त्यांनी सत्तेवर असताना केंद्र आणि राज्य शासनाकडून कोणताही निधी आणला नाहीच तर उलट त्यांनी महापौरपदाची खांडोळी करण्यात धन्यता मानली, असा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी विक्रमनगर येथे सभेत केला.
महादेवराव महाडिक यांनी शहराच्या विकासासाठी कधीही मुंबई, दिल्लीची वारी केलेली नाही. निवडून आलेल्या अपक्षांचं कडबोळे करून महापालिकेत मिळालेली सत्ता दलालांच्या हाती सोपविली. दलालांनी अक्षरश: महापालिका ओरबडून खाल्ली, महापालिका म्हणजेच भ्रष्टाचाराचे कुरण बनविले. टेंडर आणि जमिनीचे आरक्षण उठविणे आदी कामांमध्येच या ‘म्होरक्यां’ना रस होता. त्यांच्या या वृत्तीमुळे कोल्हापूर विकासापासून शेकडो मैल दूर राहिले, असेही आरोप मुश्रीफ यांनी केले.
मुश्रीफ म्हणाले, महापालिकेच्या राजकारणात दहा वर्षांपूर्वी पक्षीय राजकारणास आम्ही सुरुवात केली. सूज्ञ जनतेने महाडिक आणि कंपनीला लाथाडून राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीला सत्ता दिली. या सत्तेच्या कालावधीत शेकडो कोटी रुपयांची विकासकामांसाठी निधी खेचून आणला. सर्वोत्तम असे जिल्हाधिकारी कार्यालय बनविले. न्यायसंकुलाची देखणी इमारत बांधली. १०४ नवीन बसेस, के.एम.टी.च्या वर्कशॉपसाठी भरघोस निधी दिला. यावेळी आर. के. पोवार, उत्तम कोराणे, झहिदा मुजावर आदींसह उमेदवार अमोल मधाळे, वर्षाराणी लांडगे उपस्थित होते.