स्मशानशेड नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा
By admin | Published: May 21, 2015 11:32 PM2015-05-21T23:32:23+5:302015-05-22T00:08:58+5:30
पन्हाळा तालुका : दहा गावांत स्मशानशेडच नाही
किरण मस्कर - कोतोली -ऐन पावसाळ्यामध्ये पन्हाळा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींना स्मशानशेडच नसल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होणार आहे. याबाबत पन्हाळा पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता, तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींनी पंचायत समितीकडे स्मशानशेडबाबत आपला अहवाल पाठविलेला नाही. त्यामुळे या १७ ग्रामपंचायतींची माहिती उपलब्ध झालेली नाही.
यामध्ये प्रामुख्याने ३५ ग्रामपंचायतींना स्मशानशेड आहे; पण त्या नादुरुस्त अवस्थेत आहेत. याठिकाणचे दुरुस्ती अहवाल पंचायत समितीकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच ५४ ग्रामपंचायतींची स्मशानशेड सुसज्ज अवस्थेत आहेत, तर वाळवेकरवाडी, बादेवाडी, बोंगेवाडी, काळजवडे, कसबा ठाणे, किसरूळ, कुंभारवाडी, मानवाड, परखंदळे, पिसात्री, पोंबरे, आदी गावांना नवीन स्मशानशेड मंजूर करण्यात आली आहेत.
जी १० ते ११ गावे स्मशानशेडविना आहेत, त्याच गावांना नवीन मंजुरी मिळाली आहे. तर तालुक्यामधील एकूण १५ गावांना संयुक्त स्मशानशेड बांधण्यात आली आहेत. त्यामुळे या १५ स्मशानशेडचा विषय मार्गी लागला आहे.
ज्या ठिकाणी स्मशानशेड नाही, त्या ठिकाणी जनसुविधा योजनेंतर्गत नवीन स्मशानशेड मंजूर केले जाते. यासाठी संबंधित ग्रामपंचायतीने प्रस्ताव पाठविणे गरजेचे आहे. ते प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे पाठविले जातात व त्यानुसार निधी उपलब्ध होतो.
- बी. एम. कांबळे, विस्तार अधिकारी, पंचायत समिती पन्हाळा.
प्रशासकीय मान्यता आता मिळाली तर त्याचे टेंडर निघण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ही कामे पूर्ण होत नाहीत. ज्या ठिकाणी जुनी स्मशानशेड आहेत, अशा ठिकाणची रिपेअरी करून किमान पावसाळ्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायतीने काम करून घ्यावे, त्यासाठी पंचायत समितीकडून सहकार्य केले जाईल.
- सुनीता पाटील, सभापती,
पन्हाळा पंचायत समिती.