अपंगत्वावर मात करीत दिली दहावीची परीक्षा
By admin | Published: March 14, 2016 10:11 PM2016-03-14T22:11:34+5:302016-03-15T00:27:40+5:30
कोडोली हायस्कूलचा विद्यार्थी : मन व बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन ध्येय गाठले
रवींद्र पोवार-- कोडोली--शारीरिक अपंगत्वावर मात करीत केवळ मन व बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन कोडोली येथील कोडोली हायस्कूलचा विद्यार्थी ओंकार जितेंद्र पाटील याने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेपर्यंत ध्येय गाठले आहे.
ओंकार हा जन्मत:च हाताने व पायाने अपंग आहे. तसेच त्याची वाणीसुद्धा चोचरेपणाची आहे. केवळ कान, बुद्धी व नेत्रबळाच्या जोरावर तो दहावीपर्यंत शिक्षण घेत आला आहे. इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा तो यशवंत हायस्कूल या केंद्रावर लेखनिकाच्या सहायाने देऊ लागला आहे. आेंकारचे अपंगत्व पाहून राज्य परीक्षा मंडळाने त्याला परीक्षेच्या मदतीसाठी नववीच्या वर्गात शिकत असलेला लेखनिक मंजूर केला आहे.येथील द. रा. पाटील विद्यामंदिर येथे त्याचे प्राथमिक शिक्षण झाले आहे, तर कोडोली हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतले आहे. शिक्षणाबाबत ओंकारची असलेली आवड व जिद्द पाहून त्याला चालना देण्यासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री वाडकर, कोडोली विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोकराव पाटील, प्राचार्या श्वेता गोडबोले व माजी प्राचार्य प्रा. आप्पासो खोत यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. आई-वडिलांच्या सहकार्याबरोबरच शाळेतील या सर्वांच्या सहकार्यामुळे आज तो दहावीची परीक्षा देत आहे.
मनाधैर्याला कायम प्रेरणा
इयता नववीपर्यंत त्याला जवळपास ७० टक्क्यांपर्यंत गुण मिळत आले आहेत. ओंकारला कानाने ऐक ता येत असल्याने तो उत्तम प्रकारे गणिताचे पाडे म्हणतो. तसेच चांगल्या प्रकारे वाचनही करीत असतो. त्यास नित्यनियमाने शाळेत ने-आण करणारे त्याचे वडील जितेंद्र रघुनाथ पाटील, आई वनिता पाटील यांनी शाळेत ने-आण करणे, तसेच शालेय अभ्यासक्रमाबरोबर दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे योग्य प्रकारे संगोपन करीत या अपंग मुलाच्या मनाधैर्याला कायम प्रेरणा दिली आहे. परीक्षा मंडळाच्या मान्यतेनुसार यशवंत हायस्कूलचे केंद्रप्रमुख ए. आर. कांबळे यांनी त्याची बैठकव्यवस्था पहिल्या मजल्यावर केली असून, नियमानुसार त्याला योग्य प्रकारे सेवासुविधा दिली जात असल्याची माहिती केंद्रप्रमुख कांबळे यांनी दिली.