दबावामुळेच ‘सुगम’, ‘दुर्गम’च्या गावांचा घोळ
By admin | Published: May 20, 2017 01:18 AM2017-05-20T01:18:50+5:302017-05-20T01:18:50+5:30
शिक्षकच आमने-सामने : न्यायालयीन संघर्ष पेटणार, आरोप-प्रत्यारोपाची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी एकीकडे ‘सुगम’, ‘दुर्गम’ गावांची नवी संकल्पना पुढे आणली असताना यामध्ये आपल्या मर्जीतील शिक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी नेतेमंडळींनीच अधिकाऱ्यांवर दबाव टाकून गावांमध्ये घोळ केल्याची चर्चा रंगात आली आहे. त्याही पुढे जात आता शिक्षकांमध्येच न्यायालयीन संघर्ष पेटणार असून यामुळे शैक्षणिक वातावरण ढवळून जाणार आहे.
शासनाच्या आदेशाविरोधात शिक्षक संघटना समन्वय समितीने पंधरा शिक्षकांच्या नावावर स्थगिती घेतली होती. कोणत्याही संघटनेला स्थगिती मिळत नसल्याने ती वैयक्तिक स्वरूपात याचिका दाखल करण्यात आली होती. आता त्यामध्ये आणखी शिक्षकांची पुरवणी यादी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात शिक्षकांची बैठक घेण्यात आली. शिक्षक नेते नामदेव रेपे, कृष्णात कारंडे, बाजीराव तांदळे, राजाराम वरूटे, मोहन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी न्यायालयीन खर्चासाठीची एक हजार रुपये वर्गणीही उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिली. आता या अन्य शेकडो शिक्षकांना या याचिकेमध्ये पुरवणी स्वरूपात समाविष्ट करण्यात येणार आहे.
एकीकडे समन्वय समितीने हे आक्रमक पाऊल उचलले असताना दुसरीकडे दुर्गम शाळा शिक्षक संघानेही जशास तशी भूमिका घेतली आहे. त्यांनीही ही प्रक्रिया योग्य असून त्यानुसार ती राबवावी, असे निवेदन दिले आहे; परंतु त्यामध्ये कळीचा मुद्दा ही गावे ठरणार असून त्यावरूनच आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
निकष डावलून गावांची अदला-बदल
या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याआधी ‘सुगम’ आणि ‘दुर्गम’ गावांची यादी तयार करताना कागल आणि हातकणंगले तालुक्यांच्या दबावामुळे अनेक गावांची अदलाबदल झाल्याची चर्चा शिक्षक वर्तुळात आहे. आधी ५५७ ‘दुर्गम’ गावे असताना ती आता ६४६ गावे झाली आहेत. शंभरभर गावे आपल्या जवळच्या शिक्षकांच्या सोयीसाठी घुसडण्यात आल्याचा आरोप होत आहे.
बोरवडे दुर्गम कसे?
कागल तालुक्यातील बोरवडे गाव वेगळ्याच बाबीने चर्चेला आले आहे. या गावाला चारी बाजूने रस्ते असतानाही हे गाव ‘दुर्गम’मध्ये कसे घालण्यात आले, असा सवाल आता विचारण्यात येत आहे. सर्व सोयींनी सुसज्ज असणारे हे गाव कुणाच्या सोयीसाठी ‘दुर्गम’मध्ये घातले याबाबत आता चर्चा असून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ‘सुगम’, ‘दुर्गम’चा हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.
विस्थापित गावांमधील सेवेचे काय?
जिल्ह्यातील अनेक धरणांसाठी काही गावे आणि वसाहतींचे पुनर्वसन करण्यात आले. धरणांमध्ये पाणी साठा झाल्यानंतरही काही गावांचे अस्तित्व नकाशातून पुसले गेले. शाहूवाडी तालुक्यातील तन्हाळी, निवडे, ढाकळे, चांदेल, कोठारवाडी अशी अनेक गावे चांदोली धरणासाठी विस्थापित करण्यात आली. या गावांची नावे सुगम, दुगर्मच्या यादीत नाहीत. मात्र, धरण होण्याआधी अशा दुर्गम गावांमध्ये काम केलेल्या शिक्षकांची सेवा गृहीत धरणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.