पावसामुळे कोल्हापूरात देखाव्यांच्या तयारीत व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 06:31 PM2017-08-29T18:31:34+5:302017-08-29T18:42:57+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे गणेश मंडळांची विशेषत: देखावे करणाºया मंडळांची त्रेधातिरपीट उडाली आहे. पावसामुळे देखाव्यांसाठी रंगमंचाची सजावट, रंगकाम, नेपथ्य, विद्युत उपकरणांची जोडणी, विसर्जन मिरवणुकीतील चित्ररथ, देखाव्यांची उभारणी, तालमी अशा तयारीत व्यत्यय येत आहे. दुसरीकडे एवढा पाऊस कोसळत असला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. पावसात भिजत मंडळाची आणि देखाव्यांची कामे करण्यात कार्यकर्त्यांचे हात गुंतले आहेत.
गेल्या महिन्याभरापासून दडी मारलेल्या पावसाने गणपती बाप्पांसोबत पुनरागमन केले. पुन्हा कोसळू लागलेल्या जलधारांमुळे नागरिकांमध्ये विशेषत: शेतकरी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. असे असले तरी ऐन सणातच पडणाºया सरींमुळे उत्साहामध्येही थोडा व्यत्यय आला आहे.
यंदा घरगुती गणपती सात दिवसांचे असल्याने शुक्रवार (दि. १)पासून सार्वजनिक गणेश मंडळांचे देखावे सुरू होणार आहेत. शेवटच्या चार दिवसांत फार गर्दी वाढू नये म्हणून काही मंडळांनी देखाव्यांना सुरुवातदेखील केली आहे. पावसामुळे या देखाव्यांमध्ये आणि तयारीमध्ये व्यत्यय येत आहे.
राजारामपुरी, शाहूपुरी भागात तांत्रिक देखावे साकारले जातात. काही देखावे मांडवात, तर काही समोरच्या खुल्या जागेत साकारले जातात. मांडवातल्या देखाव्यांना फारशी अडचण नसते. मात्र, खुल्या जागेतील तांत्रिक देखावे साकारण्याचे काम पावसामुळे थांबले आहे. मंगळवार पेठेत मोठ्या उंचीच्या मूर्ती साकारल्या जातात. शिवाय सजीव देखावे असतात.
शिवाजी पेठेत ऐतिहासिक संदर्भाने आणि प्रबोधनात्मक देखावे असतात. देखाव्यांचे स्वरूप कोणतेही असले तरी त्यासाठी दोन-तीन महिने आधीपासून प्रत्येक मंडळाची तयारी सुरू असते. गेल्या दोन दिवसांपासून जोर धरलेल्या पावसामुळे या तयारीच्या वेगाला ब्रेक लागला आहे.
देखाव्याच्या मांडवाचे रंगकाम, सजावट, लाईट फिटिंग, तांत्रिक देखाव्यांच्या उपकरणांची जोडणी, देखाव्यांच्या मूर्ती प्रतिमांची उभारणी, कार्यकर्त्यांच्या तालमी, रंगभूषा, वेशभूषेची तयारी, संगीत संयोजन, नेपथ्य, प्रकाशयोजना या सगळ्याच तयारीची कामे पाऊस असेपर्यंत थांबवावी लागतात.
एकीकडे पावसाचा व्यत्यय असला तरी दुसरीकडे कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा आहे. पावसाची तमा न बाळगता मंडळांचे कार्यकर्ते देखाव्यांसाठी रात्रंदिवस राबत आहेत. दिवसा पाऊस पडत असल्याने रात्री लाईटची सोय करून तयारी पूर्णत्वाकडे नेली जात आहे. ज्या मंडळांनी आधीपासूनच देखावे खुले केले आहेत, ते पाहण्यासाठी येणाºया नागरिकांची गर्दी कमी आहे.
आमचा यंदादेखील ऐतिहासिक देखावा आहे. सध्या रंगमंचाच्या नेपथ्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे ते थांबविण्यात आले आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी चित्ररथ तयार करण्याचे कामही थांबले आहे. कार्यकर्ते मात्र भर पावसात भिजूनही मंडळाचे काम रात्री उशिरापर्यंत करीत आहेत.
- गजानन यादव,
अध्यक्ष, लेटेस्ट तरुण मंडळ
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून आमच्या मंडळाचा देखावा सुरू होतो. त्यासाठी गेले दोन-तीन महिने कार्यकर्ते राबत आहेत. देखाव्यांवर मोठ्या प्रमाणात खर्चही करण्यात आला आहे; पण पावसामुळे नागरिकांना घरातून बाहेरच पडता येत नसल्याने देखाव्याला गर्दी कमी आहे.
- कपिल चव्हाण,
राधाकृष्ण तरुण मंडळ