घोटाळ्यामुळे वस्त्रोद्योगाची विश्वासार्हता धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:55 PM2019-05-19T23:55:23+5:302019-05-19T23:55:28+5:30
राजाराम पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : सूत खरेदी-विक्री व्यवहार असलेल्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा ...
राजाराम पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : सूत खरेदी-विक्री व्यवहार असलेल्या विश्वासार्हतेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा उजेडात येऊ लागला आहे. सूत व्यापारी व कापड उत्पादक यंत्रमाग कारखानदार यांच्यात दुवा असलेला ‘दलाल’ सुताची खरेदी करताना त्यांच्यात असलेल्या विश्वासार्हतेचाच गैरफायदा घेत असल्याचे उघड होत आहे.
दररोज सुमारे १५० कोटींहून अधिक रुपयांच्या या उलाढालीमध्ये काही अटी व नियम घालण्याची आवश्यकता आहे. काही दलालांमुळे धोक्यात आलेली विश्वासार्हता व्यापारी, दलाल व कारखानदार यांनी एकत्रित येऊन पुन्हा निर्माण करावी लागणार आहे.
शहरामध्ये यंत्रमागांची संख्या मर्यादित असताना काही मोजक्या सूत व्यापाऱ्यांमार्फत कापड विणण्यासाठी आवश्यक असलेल्या सुताचा पुरवठा होत असे, तर कापड व्यापाऱ्यांकडून मजुरीवर यंत्रमागधारकांकडून कापड विणून घेतले जाई. तेव्हा संबंधित कापड व्यापारी सूत व्यापारी किंवा सूत गिरण्यांकडून थेट सुताची खरेदी करीत. अलीकडील ३० वर्षांच्या कालावधीत यंत्रमागांची संख्या वाढली. त्याचबरोबर स्वत: कापड उत्पादन करणाºया यंत्रमाग कारखानदारांचीही संख्या वाढली. त्यामुळे सूत व्यापारी व कापड विणण्यासाठी सुताची आवश्यकता असलेला यंत्रमाग कारखानदार यांच्यामध्ये दुवा म्हणून दलालांनी या व्यवसायात प्रवेश केला.
दहा वर्षांच्या कालावधीत यंत्रमागांबरोबरच आॅटोलूमची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. शहराबरोबरच परिसरातही यंत्रमाग व आॅटोलूम यांचे कारखाने झाले. साहजिकच कारखानदारांच्या वाढत्या संख्येबरोबर सूत व्यापाºयांसह सूत दलालांचीही संख्या वाढली. यापूर्वीही सूत खरेदी-विक्रीमध्ये काही घोटाळे झाले आहेत. त्यावर उपाय म्हणून सुताच्या खरेदीकरिता थेट धनादेश घेण्याची प्रथा सूत व्यापाºयांनी अस्तित्वात आणली. त्यानंतर मात्र बहुतांशी घोटाळे कमी झाले. त्याचबरोबर व्यापारी व कारखानदारांच्यात दुवा असलेला दलाल हाही मोठा विश्वासार्ह घटक बनून राहिला.
अलीकडील सात-आठ महिन्यांमध्ये ‘नंदकुमार’ नावाच्या एका सूत दलालाने त्याच्याशी संबंधित असलेल्या काही यंत्रमाग कारखानदारांच्या नावावर सूत व्यापाºयांकडून खरेदी केलेले सूत परस्पर विकले. सूत विकताना बºयाच वेळा कमी दराने सूत दिले गेले. अशा प्रकारे या व्यवहारात आलेल्या नुकसानीमुळे त्याला सुताचे पेमेंट करताना बºयाच अडचणी निर्माण झाल्या आणि सुताचे पेमेंट थकल्याने त्यावेळी सुताचा सुमारे पाच कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता.
सूत व्यापारी व यंत्रमाग कारखानदार यांच्यातील खरेदी-विक्रीच्या उलाढालीमध्ये दुवा असलेल्या दलालावर दोन्ही बाजूंनी विश्वास असतो. त्यामुळे दोन्हींकडूनही त्याच्या विश्वासार्हतेवर खरेदी-विक्री बिनधास्तपणे सुरू असते. याचाच गैरफायदा घेऊन खरेदी केलेले सूत परस्पर विकणे आणि फसवणूक करणे हा नवीन फंडा आता उदयास आला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये ‘नंदकुमार’ च्या झालेल्या सूत खरेदी-विक्रीतील घोटाळ्याची पुनरावृत्ती नव्याने उघडकीस येत आहे. त्यामध्ये संबंधित दलालाच्या व्यवहारामध्ये अंदाजे दहा कोटी रुपयांच्या सूत खरेदीमध्ये सुमारे पंधरा व्यापारी अडकले आहेत. मात्र, व्यापारीवर्गांकडून याची वाच्यता न करता पेमेंटबाबत अॅडजेस्टमेंट करण्यासाठी संबंधितांमध्ये अद्यापही चर्चा सुरू आहे.
बुक केलेल्या सुताची व्यापाºयाने खात्री करावी : महाजन
शहर व परिसरामध्ये सुमारे दीड लाख यंत्रमाग-आॅटोलूम आहेत. यावर कापड उत्पादनासाठी दररोज १५० कोटी रुपयांची सुताची खरेदी होते. कारखानदारांच्या नावावर सुताची खरेदी होत असताना दलालाकडून सूत व्यापाºयाच्या पेढीवर बुक केलेल्या सुताची संबंधित व्यापाºयाने कारखानदाराकडे दूरध्वनीद्वारे खात्री करावी. त्याचे नाव, त्याचा जीएसटी नंबर आणि कारखानदाराने दिलेल्या धनादेशाची खात्री केल्यास या सूत खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अधिक विश्वासार्हता येईल, अशी अपेक्षा यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन यांनी व्यक्त केली. व्यापारी, कारखानदार व दलाल यांनी एकत्र बसून त्याची नियमावली तयार करावी.