टंचाईमुळे जिल्ह्यात कूपनलिका खुदाईचा धडाका
By Admin | Published: May 17, 2016 12:39 AM2016-05-17T00:39:37+5:302016-05-17T01:20:08+5:30
जिल्हा प्रशासन : धरणात पिण्यासाठी पाणी राखीव; उद्योगांची २० टक्केच पाणी कपात
कोल्हापूर : जिल्ह्णातील पाणीटंचाई निवारण्यासाठी खासगी आणि शासकीय यंत्रणेकडून कूपनलिका खुदाईचा धडाका लावला आहे. आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने मंजूर केलेल्या ३६ पैकी २९ कूपनलिकांची खुदाई केली आहे. त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यासाठी कूपनलिका खुदाईलाच प्राधान्य दिले जात आहे. सर्वच धरणात पिण्यासाठी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांतदादापाटील यांनी गेल्या महिन्यात येथील उद्योगांची २५ टक्के पाणी कपात केल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात २० टक्केच पाणी कपात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे पूर्णक्षमतेने लघुपाटबंधारे प्रकल्प व धरण भरली नाहीत. परिणामी, शहरासह ग्रामीण भागातही पाणी टंचाई जाणवत आहे. पाटबंधारे विभागाने सर्वच धरणातील एकूण पाणीसाठ्यात पिण्यासाठी राखीव साठा ठेवला आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे; परंतु ज्या गावात धरणाचे पाणी योजनाद्वारे पुरवठा होत नाही. तशा गावात टंचाई निर्माण झाल्यास प्रशासन कूपनलिका खुदाई करीत आहे. असलेल्या पाण्याचे स्रोत आटल्याचे ग्रामपंचायतीकडून तहसील कार्यालयास माहिती आल्यानंतर त्वरित कूपनलिका खुदाई मंजुरी दिली जात आहे. प्रत्यक्षात कूपनलिका खुदाईचे काम जिल्हा परिषद पाणीपुरवठा यंत्रणेकडून केले जात आहे. कूपनलिकेस पाणी लागल्यास त्या भागातील रहिवाशांची तहान भागत आहे. अनेक ठिकाणी पाणीपातळी खालावल्याने कूपनलिकेचा प्रयोग फसत आहे.
कूपनलिकांशिवाय अन्य उपाययोजना लालफितीतच अडकल्या आहेत. आराखड्यातील ५७ कामे मंजूर झाले आहेत. मात्र, कूपनलिका सोडून अन्य एकही काम पूर्ण झालेले नाही. पाटंबधारे विभागाने उपसाबंदी करून शेतीवरील पाणी वापरावर निर्बंध आणले आहेत. परिणामी, उसासह उन्हाळी पिके वाळत आहेत. त्यामुळे शेतकरी केवळ शेतीलाच पाणी उपसा बंदी का, असा सवाल उपस्थित करीत पाटबंधारे प्रशासनास धारेवर धरत आहेत.
गेल्या महिन्यात टंचाई आढावा बैठकीत उद्योगासाठीचे २५ टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय झाल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. राज्य उद्योग प्रशासनाशी संपर्क साधून विचारणा केल्यानंतर उद्योजकांचे २० टक्केच पाणी कपात केल्याचे सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने पंचतारांकित औद्योगिक वसाहतीस दूधगंगा नदीतून, तर गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीस पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. सर्व उद्योजकांना रोज सरासरी २५ ते २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. दुष्काळामुळे २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे रोज पाच दशलक्ष लिटर पाण्याची बचत होत आहे.