सोयाबीनमुळे जावळीतील शेतकरी मालामाल

By admin | Published: November 23, 2014 10:23 PM2014-11-23T22:23:56+5:302014-11-23T23:51:16+5:30

ग्रामबीजोत्पादन कार्यक्रम : महिगावसह पाच गावांत यशस्वी अंमलबजावणी

Due to soyabean, Jawali farmer Malalmal | सोयाबीनमुळे जावळीतील शेतकरी मालामाल

सोयाबीनमुळे जावळीतील शेतकरी मालामाल

Next

कुडाळ : जावळीतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने हंगामी पीकच महत्त्वाचे असते. या पिकावर शेतकरी अवलंबून असतो. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी नगदी पिकांवर अधिक भर देऊन आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषी विभागाच्या ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमातून या विभागातील शेतकऱ्यांनी एकरी लाखापर्यंत उत्पन्न मिळविल्यामुळे शेतकरी मालामाल झाले आहेत.
कृषी सहायक एम. एम. गोसावी यांच्या प्रयत्नांतून आनेवाडी मंडलातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाद्वारे शेतीप्रयोग केले. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळू लागला आहे. कृषी कंपन्यांच्या बियाण्याद्वारे पेरणी करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याने कंपन्यांचाच फायदा होतो. याला छेद दिला जावा व शेतकऱ्यांनी स्वत:च दर्जेदार बियाणे तयार करून आपला आर्थिक फायदा करून घ्यावा या दृष्टिकोनातून ही ग्रामबीजोत्पादन योजना राबविण्यात येते. याद्वारे महिगाव, मोरघर, दरेखुर्द, पवारवाडी, दुदुस्करवाडी यासह आनेवाडी विभागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. यावर्षी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊन भात, भुईमूग यांसारख्या पिकांना उतार न मिळाल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्याच वेळी ग्रामबीजोत्पादनाच्या माध्यमातून सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना तारले.
महिगाव येथील शेतकऱ्यांनी ४० एकरात जवळपास ५०० क्विंटल एवढे उत्पन्न मिळविले. प्रत्येक शेतकऱ्याला एक एकर क्षेत्रात जवळपास एक लाखाचे उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या सोयाबीन पिकाचे दर्जेदार बियाणे तयार करून ते बचतगटांद्वारे बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

एकरी लाखाचे उत्पन्न
शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून सोयाबीन पीक घ्यायला सुरुवात केली. एकरी एक लाखापर्यंत उत्पन्न शेतकऱ्याला मिळू लागले. महिगावमधील जय हनुमान बचत गटाने ८८५० किलो, इंद्रायणी कृषी बचतगटाने ५०० किलो, दुदुस्करवाडीतील बचतगटाने ३८०० किलो एवढे बियाणे निर्माण केले आहे. या दर्जेदार बियाण्याला बाजारात मागणी असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.


शेतकऱ्याने स्वत:च बियाणे निर्मिती केल्याने आणि या दर्जेदार बियाण्याला उत्पन्नात उतारही मिळत असल्याने पश्चिम महाराष्ट्रातून शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्याला मागणी वाढू लागली
आहे.
- एम. एम. गोसावी,
कृषी सहायक, सायगाव

Web Title: Due to soyabean, Jawali farmer Malalmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.