‘स्टिंग’मुळे जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले..!

By admin | Published: January 6, 2015 12:01 AM2015-01-06T00:01:10+5:302015-01-06T00:45:20+5:30

यंत्रणा चक्रावली : पेठमधून पश्चिम महाराष्ट्रात बनावट दारूचा पुरवठा होत असल्याची शक्यता, धक्कादायक माहिती

Due to the 'sting', the killings of poisonous liquor remained in the district ..! | ‘स्टिंग’मुळे जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले..!

‘स्टिंग’मुळे जिल्ह्यात विषारी दारूचे हत्याकांड टळले..!

Next

सचिन लाड -सांगली -पेठ (ता. वाळवा) येथे बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त झाल्याने जिल्ह्यात विषारी दारूचे मोठे हत्याकांड टळले आहे. संशयित दारू तयार करण्यासाठी इथेनॉलचा वापर करीत होते. इथेनॉलच्या जागी त्यांच्या हाती मिथेनॉल मिळाले असते तर, विषारी दारूची निर्मित्ती होऊन फार मोठे हत्याकांड झाले असते, हे वास्तव या कारवाईतून समोर आले आहे. कारण मिथेनॉल व इथेनॉल हे दोन्ही पदार्थ ओळखता येत नाहीत आणि मिथेनॉल हा विषारी द्रवपदार्थ आहे. सांगलीसह पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकात या बनावट दारूचा पुरवठा झाल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे.
सुधीर अर्जुन शेलार हा नववीपर्यंत शिक्षण झालेला अवघ्या २१ वर्षांचा तरुण पैलवान आहे. सांगलीत एका कुस्ती केंद्रात तो शिकायला होता. कुस्तीचे आखाडे गाजविण्याचे वय असलेला पैलवान झटपट आणि काळा धंदा करून श्रीमंत होण्याचे स्वप्न बाळगून होता. दारूच्या धंद्यात फार मोठी कमाई असल्याचे त्याला वाटायचे. यामुळे या धंद्यात उडी घेऊन स्वत:च दारू निर्मितीचा कारखाना तयार करण्याचा त्याने ठरविले. यासाठी त्याने पैलवानकीला रामराम ठोकला. गतवर्षी तो कर्नाटकातील गोकाक येथे गेला. तेथील दारू तस्करांना दक्षिणा देऊन बनावट दारू तयार करण्याचे त्याने धडे घेतले. दारूचा कारखाना स्वत:च्या शेतात सुरू केला. आजू-बाजूच्या लोकांना याची कल्पनाही येणार नाही, असा त्याने कारखाना उभा केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांना दोन महिन्यांपूर्वी त्याच्या या कारखान्याची माहिती मिळाली होती. तसा विषय खूप गंभीर असल्याने कोरे यांनी कारवाईसाठी कोणतीही गडबड केली नाही. दोन महिने कोरे यांचे पथक या कारवाईचे नियोजन करत होते. यासाठी विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, अधीक्षक प्रकाश गोसावी, निरीक्षक कोरे यांची बैठक झाली. ‘स्टिंग आॅपरेशन’द्वारे हा कारखाना उद्ध्वस्त करण्याचा निर्णय झाला. यासाठी २० जणांचे पथक तयार केले. संशयित शेलारचा मोबाईल क्रमांक घेण्यात आला.
शेलारच्या क्रमांकावर बोगस ग्राहक म्हणून पथकाने संपर्क साधला. दारू मिळेल; पण प्रथम अनामत रक्कम बँक खात्यावर भरायला लागेल, असे त्याने सांगितले. तसेच त्याने ‘तुम्ही कोण, काय करता, माझे नाव कोणी सांगितले, येथे दारू मिळते, हे तुम्हाला कसे कळाले,’ अशा अनेक प्रश्नांचा त्याने भडीमार केला; मात्र पथकाने त्याच्या प्रश्नांची योग्य ती उत्तर दिली. यामुळे त्याला जराही संशय आला नाही. दारू पाहिजे, यासाठी तीन ते चारवेळा झालेले संभाषण रेकॉर्डही करण्यात आले आहे.


मिथेनॉल स्वस्त...
मिथेनॉल हा पदार्थ स्वस्त व विषारी आहे. इथेनॉल आणि मिथेनॉल यामधील फरक ओळखून येत नाही. शेलारने इथेनॉलचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. इथेनॉलच्या जागी त्याला मिथेनॉल मिळाले असते, तर विषारी दारू तयार झाली असती. ही दारू पिऊन लोकांचे बळी गेले असते. या कारखान्याची लवकर माहिती मिळाल्याने पुढील अनर्थ टळला असल्याचे अधीक्षक प्रकाश गोसावी यांनी सांगितले.


अनेकांची नावे निष्पन्न
शेलारकडून दारू खरेदी करणाऱ्या अनेकांची नावे निष्पन्न झाली आहेत. गेल्या वर्षभरापासून हा कारखाना सरू असण्याची शक्यता आहे. मात्र शेलारच्या चौकशीत त्याने दोन महिन्यांपासून हा धंदा करीत असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी काढण्यात आली आहे. तेच लोक त्याच्याकडून दारू खरेदी करीत असावेत. ते कोण आहेत, याचा लवकरच उलगडा करू, असे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी सांगितले.

स्वस्तात मस्त... पाहिजे त्या कंपनीची!

शेलार हा पाहिजे त्या कंपनीची दारू अवघ्या दोन मिनिटात सहजपणे तयार तयार करतो. स्पिरिट आणि इथेनॉलचे मिश्रण तयार असतेच. यामध्ये तो शुद्ध पाणी, कंपनीनुसार रंग व सेंट मारत असे. प्रामुख्याने ढाबे व ज्या गावात दारूच मिळत नाही, अशा ठिकाणी तो दारू विकत होता, अशी माहिती पुढे आली आहे. देशी दारूचा दीड हजाराचा बॉक्स हजारात, तर विदेशी दारूचा सहा हजाराचा बॉक्स साडेतीन हजारात विकत होता.

Web Title: Due to the 'sting', the killings of poisonous liquor remained in the district ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.