अंधश्रद्धेमुळे गेला महिलेचा जीव !
By admin | Published: April 30, 2015 12:48 AM2015-04-30T00:48:45+5:302015-04-30T00:48:59+5:30
भूतबाधेच्या समजुतीतून जादूटोणा : कोल्हापुरातील प्रकार; ‘अंनिस’ने रुग्णालयात केले होते दाखल
कोल्हापूर : ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून गेल्या दोन महिन्यांपासून धार्मिक स्थळी जादूटोण्याद्वारे वैद्याकडून उपचार करून घेणाऱ्या राजेंद्रनगर येथील ४५ वर्षांच्या महिलेला बुधवारी सकाळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला सदस्यांनी नातेवाइकांचा विरोध झुगारुन खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असताना अखेर ‘त्या’ महिलेचा मृत्यू झाला.
संबंधित महिला ही दोन महिन्यांपासून आजारी होती. उचक्यांमुळे ती मोठमोठ्याने किंचाळत होती. गरिबीमुळे तिला २७ एप्रिल रोजी नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. तेथे दोन दिवस उपचार करून घरी नेले. पुन्हा ती वेड्यासारखे करू लागल्याने तिला ‘भूतबाधा’ झाल्याच्या समजुतीतून नातेवाइकांनी वैद्याकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी नातेवाईक तिला घेऊन ताराबाई रोड परिसरातील एका धार्मिक स्थळी घेऊन गेले. या ठिकाणी वैद्याने तिला अंगारा लावून पाणी शिंपडले. तिची प्रकृती अत्यवस्थ होती. वेदनेने तिला सरळ उभेही राहता येत नव्हते. अशा बिकट परिस्थितीत नातेवाईक तिला रिक्षातून घरी घेऊन जात होते.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या गीता जाधव यांना हा प्रकार दिसला. महिलेची अवस्था पाहून त्यांना राहवले नाही. त्यांनी नातेवाइकांना ‘महिला खूप अशक्त झाली आहे, तिला रुग्णालयात दाखल करा, ती बरी होईल,’ असे सांगितले. यावेळी त्यांनी ‘तुम्ही काही सांगू नका. सगळीकडे फिरलो आहे; पण काही फरक पडलेला नाही,’ असे सांगून ते निघाले असता जाधव यांनी आपल्या वरिष्ठ सहकारी सीमा पाटील यांना बोलावून घेतले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नातेवाइकांना सांगितले. नातेवाइकांनी विरोध केला; परंतु पोलिसांत तक्रार करणार असे दरडावताच नातेवाइक रुग्णालयात दाखल करण्यास तयार झाले. सीमा पाटील यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या सहकार्याने कदमवाडीतील रुग्णालयात तिला दाखल केले. तिच्यावर तातडीने उपचार करण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा उचकी लागून तिचा मृत्यू झाला आणि डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले. (प्रतिनिधी)
वेळेत उपचार झाले असते तर जीवदान
वेळेत योग्य उपचार झाले असते तर महिलेला जीवदान मिळाले असते; परंतु नातेवाइकांच्या अंधश्रद्धेच्या हट्टापायी महिलेला आपला जीव गमावावा लागल्याची रुग्णालय परिसरात चर्चा होती.
नेमका महिलेचा मृत्यू कशामुळे झाला, याचे निदान होण्यासाठी तिचा मृतदेह सीपीआरमध्ये विच्छेदनासाठी आणण्यात आला. याठिकाणी डॉक्टरांनी तिचा व्हिसेरा राखून ठेवला आहे.