‘शेकाप’च्या पाठबळामुळे हत्तीचे बळ - धनंजय महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 04:56 PM2019-04-04T16:56:20+5:302019-04-04T16:58:16+5:30
आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही. यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ
कोल्हापूर : आजपर्यंतच्या राजकीय जीवनात अनेक वेळा संपतराव पवार यांच्याकडे मदतीसाठी गेलो पण त्यांनी डाव्या विचाराचे तत्वज्ञान सोडून कधीच मदत केली नाही. यावेळेला मोठ्या मनाने देशातील शेतकरी, कष्टकरी विरोधी हिटलरशाही सरकार उलथवून लावण्यासाठी त्यांनी पाठबळ दिले, यामुळे मला हत्तीचे बळ मिळाल्याचे प्रतिपादन राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी केले.
शेतकरी कामगार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक गुरूवारी झाली, यामध्ये पक्षाच्या धोरणानुसार आघाडीसोबत राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. महाडिक म्हणाले, भुलभुलय्या करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. संविधान मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या भाजपला सत्तेची मगुरूरी आली आहे. सरकारच्या कारभाराला सामान्य माणूस वैतागला असून समाजातील कोणाताही घटक समाधानी नाही. शेतकरी आत्महत्या, शेतीमालाला हमीभाव, बेरोजगारी, महागाई या मुद्यावर ही निवडणूक होणे अपेक्षित होते, पण भाजपची मंडळी सर्जिकल स्ट्राईक करून लोकांच्या परिवर्तनाचा प्रयत्न करत आहे.
संपतराव पवार म्हणाले, कष्टकरी-श्रमजिवी लोकांसाठी मैदानात उतरण्याची वेळ आली त्यावेळी उतरलो, त्यावेळी कोण बरोबर होता किती मते पडली हे महत्वाचे नव्हते. आताची परिस्थिती वेगळी असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटनाच धोक्यात आली आहे. मनुवादी प्रवृत्ती देशातून हद्दपार करण्यासाठी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय डाव्यांनी घेतला. आमची ताकद मर्यादीत असेल पण जी मदत होईल ती प्रामाणिकपणेच करू.
पुन्हा सर्जिकल स्ट्राईक शक्य
पाकिस्तानचे दहा सैनिक मारल्याचा दावा केला जातो, मग तेथील प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी एकही ओळ कशी आली नाही. ही निवडणूक केवळ सर्जिकल स्ट्राईक भोवतीच फिरवण्याचा डाव असून येत्या आठ-दहा दिवसात आणखी एक सर्जिकल स्ट्राईक झाला तर आश्चर्य वाटायला नको, अशी टीका धनंजय महाडिक यांनी केली.
दोन्ही कॉँग्रेस उन्हातील ‘पुरोगामी’
आम्ही आतापर्यंत तत्वज्ञान घेऊन चाललो, पुरोगामी विचार जोपासणाºया कॉँग्रेस, राष्टÑवादीला आम्ही पाठींबा देऊन सत्तेवर बसवले. पण त्यांचे उन्हात उभे राहिलेले पुरोगामीत्व आहे. वेळ पडलीतर सावळीत जाऊन प्रतिगाम्यासोबत राहू शकतात. असा टोलाही संपतराव पवार यांनी लगावला.
‘त्यांचे’ किती ऐकायचे ते ठरवा
तुम्हाला निवडणक जिंकायची आहे, सगळ्यांना सोबत घेऊन जावे लागणार आहे. आम्हाला कोणाचे वावडे नाही, उद्या पटले नाहीतर तुमच्यासोबत नसेनही, समाजासाठी त्रास सहन करण्याची ताकद आमच्यात आहे. पण काहीजण चुकीची माहिती सांगतील, त्यांचे किती ऐकायचे ते ठरवा, असे पवार यांनी कॉँग्रेस नेत्यांचे नाव न घेता इशारा दिला.