संप तूर्त स्थगित, पेट्रोलपंप सुरु राहणार
By admin | Published: May 13, 2017 04:35 PM2017-05-13T16:35:33+5:302017-05-13T16:35:33+5:30
पेट्रोलपंपांवर गर्दी : बुधवारनंतर ठरणार आंदोलनाची दिशा
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : पेट्रोलपंपचालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रविवारपासून पुकारलेला संप तेल कंपन्यांनी दिलेल्या चर्चेच्या लेखी निमंत्रणामुळे तूर्त स्थगित करण्यात आला. त्यामुळे रविवारी सर्व पेट्रोलपंप सुरु राहणार असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी दिली.
रविवारपासून दर रविवारी साप्ताहिक सुटी व सोमवारपासून सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच पेट्रोल-डिझेलपंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रविवारी जिल्ह्यातील २६६ पेट्रोलपंप बंद राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपांवर पेट्रोल-डिझेल भरुन घेण्यासाठी वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. अनेक पेट्रोलपंपांवर रविवारी पेट्रोल-डिझेलपंप बंद राहणार असल्याचे फलकही झळकले होते.
शासनमान्य आॅईल कंपन्यांनी शासकीय समितीच्या (अपूर्व चंद्रा समिती) अहवालाची अंमलबजावणी केलेली नाही. शिवाय ४ नोव्हेंबर २०१६च्या कराराचे पालन केलेले नाही. त्यामुळे सर्व पेट्रोलपंपचालक खर्चात बचत करणाऱ्या कार्यपद्धतीचा अवलंब करणार आहेत. २०११ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या कमिशनच्या अनुषंगाने केंद्र सरकारने तोडगा काढला होता. त्यात वर्षातून दोनवेळा कमिशन वाढविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानंतर कमिशनबाबत तेल कंपन्या आणि सरकार यांच्यात अनेकदा बैठका झाल्या. मात्र, प्रत्यक्षात कमिशन काही वाढलेले नाही.
या पार्श्वभूमीवर फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनची (फामफेडा) बैठक झाली. त्यात पेट्रोलपंपचालक प्रत्येक रविवारी साप्ताहिक सुटी व दि. १५ मे पासून सिंगल शिफ्ट आॅपरेशन अंतर्गत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण तेल कंपन्यांनी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनला पत्र देऊन हा संप मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच येत्या बुधवारी (दि. १७) चर्चेचे निमंत्रण देण्यात आल्याने रविवारपासून सुरु होणारे आंदोलन पेट्रोलपंपचालकांनी तूर्त स्थगित ठेवले.
रविवारी पेट्रोलपंपचालक साप्ताहिक सुटी घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिवसभर सर्वच पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक वाहनधारकांने दोन दिवसांचा इंधनसाठा करून ठेवला.रविवारी आणि सोमवारपासून पुढे नेहमीप्रमाणे पेट्रोलपंप सुरु राहतील असे अध्यक्ष माणगावे यांनी यावेळी जाहिर केले.
तेलकंपन्यांशी बुधवारी होणाऱ्या झालेल्या चर्चेनंतरच आंदोलनाची पुढील दिशा ‘फामफेडा’कडून जाहिर केली जाणार आहे.
गजकुमार माणगावे,
अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल डिलर्स असोसिएशन