Kolhapur: लाडक्या बहिणींच्या अनुदानाचा ४५२ कोटींचा बोजा, योजना सुरू राहिली तर..
By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 11, 2024 01:42 PM2024-10-11T13:42:56+5:302024-10-11T13:43:28+5:30
पैसेवाल्या सुटल्या, गरीब अडकल्या..
इंदुमती गणेश
कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील १० लाख ६ हजार ३११ महिला लाभार्थींमुळे गेल्या तीन महिन्यांत शासनाच्या तिजोरीवर तब्बल ४५२ कोटी ८३ लाख ९९ हजार ५०० इतक्या रकमेचा बोजा पडला आहे. योजना अशीच सुरू राहिली तर फक्त जिल्ह्यात वर्षाला १८११ कोटी ३५ लाख ९८ हजार रुपयांचे अनुदान लागणार आहे. यामुळे शासनाच्या तिजोरीत ठणठणाट होऊन त्याचा भार शेवटी सर्वसामान्य नागरिकांवरच पडणार आहे.
राज्यात जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. तेव्हापासून गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातून १० लाख २२ हजार ४१ अर्ज आले आहेत. त्यापैकी १० लाख ६ हजार अर्जांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे नव्वद टक्के महिलांच्या खात्यावर तीन महिन्यांचे ४५०० रुपये जमा झाले आहेत. ज्या १ लाख ११ हजार महिलांचे बँक खाते आधारसोबत लिंक झालेले नाही त्यांची यादी महिला व बालकल्याण विभागाने गावनिहाय यादी पाठवून या महिलांचे आधार लिंकिंग करायला लावले आहे.
या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीत शब्दश: ठणठणाट होत असून त्याचा भार पुन्हा करदात्या व सर्वसामान्य नागरिकांवर पडणार आहे. सध्याची जिल्ह्याची आकडेवारी पाहता १० लाख महिलांना एका महिन्याचे १५०० रुपये याप्रमाणे १५० कोटी ९४ लाख ६६ हजार ५०० रुपये तर तीन महिन्यांचे ४५२ कोटी ८३ लाख ९९ हजार ५०० रुपये द्यावे लागले आहेत. राज्यात सत्ताबदल झाला नाही आणि ही योजना अशाच पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहिली तर वर्षाला शासनाच्या फक्त काेल्हापूर जिल्ह्यासाठी १८११ कोटी ३६ लाखांची तरतूद करावी लागेल.
पैसेवाल्या सुटल्या, गरीब अडकल्या..
ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांचे बँक खाते आधारशी लिंकिंग आहे त्यांना अनुदान लगेच मिळाले, पण ज्यांचे हातावर पोट आहे, ज्या महिला कधी बँकेत गेलेल्या नाहीत, कागदपत्रांचा अभाव आहे अशाच महिलांना हे अनुदान अद्याप मिळालेले नाही. त्यांना दाद कुणाकडे मागावी, हेदेखील कळेनासे झाले आहे.
लाडकी बहीण योजनेची जिल्ह्यातील स्थिती
- योजनेसाठी आलेले अर्ज : १० लाख २२ हजार ४१
- मंजूर अर्ज : १० लाख ६ हजार ३११
- आधार सीडिंग न झालेले : ८५ हजार ८४८