कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप; नदीचे पाणी पात्रात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 12:12 PM2024-07-13T12:12:02+5:302024-07-13T12:12:37+5:30
आजपासून जोर पकडण्याची शक्यता
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, शुक्रवारी दिवसभर पावसाची उघडझाप राहिली, धरणक्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने नद्यांच्या पातळीत घट होत आहे. पंचगंगेसह सर्वच नद्यांचे पाणी पात्रात गेले असून पाण्याखाली गेलेले बंधारे मोकळे होऊ लागले आहेत. आज, शनिवारपासून पाऊस पुन्हा जोर पकडेल, असा अंदाज आहे.
गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यात दिवसभरात अधूनमधून हलक्या ते जोरदार सरी कोसळत आहेत. शुक्रवारी दुपारी कोल्हापूर शहरात जोरदार सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश मोकळे झाले.
काल, शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच २२.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही पाऊस कमी झाला असून विसर्गही कमी होत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत घसरण होऊ लागली आहे. पंचगंगा नदीसह सर्व नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे.