दसऱ्याच्या मुहूर्तांवर अर्थचक्राला मिळाली गती, ऑटोमोबाइल क्षेत्रात कोटींचे सीमोल्लंघन
By संदीप आडनाईक | Published: October 7, 2022 05:41 PM2022-10-07T17:41:39+5:302022-10-07T17:53:47+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता
संदीप आडनाईक
कोल्हापूर : दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा, असे म्हटले जाते, याची प्रचीती दोन वर्षांनंतर यंदा बाजारपेठेत दिसून आली. यंदा बाजारात प्रचंड उत्साह होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे हा बाजार ठप्प झाला होता. यंदा मात्र, अर्थचक्राला गती मिळाल्याचे दिसून आले.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या दसऱ्याच्या सणाला दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच्या विक्रीने सीमोल्लंघन केले आहे. यापूर्वीच्या विक्रीच्या तुलनेत यंदा दुचाकी विक्रीने चार कोटींचा, तर चारचाकीच्या विक्रीत दोनशे कोटी रुपयांचा उच्चांक गाठल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची सरासरी पन्नास टक्के इतकी विक्रमी विक्री झाल्याने अर्थचक्राला मोठी गती मिळाली.
एकाच दिवशी १८५० दुचाकींची विक्री
शहरातील वेगवेगळ्या विक्रेत्यांकडे सुमारे १८५० पेट्रोलवरील दुचाकींची विक्री झाली. यामध्ये युनिक ऑटोमोबाइलमध्ये ४५०, पॉप्युलर ऑटो येथे ३५०, माय ह्युंदाईमध्ये १०५० दुचाकींची विक्री झाली.
१२२० चारचाकींची विक्री
दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरातील विक्रेत्यांकडे सुमारे १२२० चारचाकी वाहनांचीही विक्री झाली आहे. यामध्ये महिंद्राच्या चारचाकी कार आणि मालवाहतूक अशा २००, युनिक ऑटोमोबाइलमध्ये ३६०, माय ह्युंदाईमध्ये १७५, साई सर्व्हिसमध्ये २५०, चेतन मोटर्समध्ये १३५, भारत निसानमध्ये ४०, सोनक टोयोटामध्ये ६० चारचाकी गाड्यांची विक्री झाली आहे. अनेक ग्राहकांनी महिनाभर आधीपासूनच मोटारसायकलचे बुकिंग करून ठेवलेले होते. त्यांच्याशिवाय विक्रेत्यांनी दसऱ्याला ऐनवेळी येणाऱ्या ग्राहकांनाही नाराज न करता मोटारसायकल देण्यात आली.
चारचाकीसाठी सहा-सहा महिने वेटिंग
दसऱ्याच्या मुहूर्तावर जरी वाहनांची विक्री झाली असली तरी यातील काही आलिशान गाड्यांसाठी ग्राहकांना सहा महिने वेटिंग करावे लागणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिंद्रा, मारुती सुझुकी, ह्युदाई, फोक्सवॅगन, रेनाॅल्ट, एमजी, टाटा, स्कोडा, निसान, टोयोटा अशा चारचाकी आलिशान गाड्यांची आणि मालवाहतूक गाड्यांना प्रचंड मागणी असून त्यासाठी ग्राहक प्रतीक्षा करण्यासही तयार आहेत.
इलेक्ट्रिक वाहनेही जोरात
पेट्रोलवरील दुचाकीप्रमाणेच इलेक्ट्रिक वाहनांची विक्रीही जोरात आहे. दसऱ्याच्या दिवशीच या इलेक्ट्रिक गाडीला मोठी मागणी होती. यंदा ३५० हून अधिक इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री झाली आहे. तुलनाच करायची झाली तर बाजारपेठेत साठ, चाळीस असा व्यवहार इलेक्ट्रिक गाड्यांनी केला आहे. सुमारे अडीच कोटींचा व्यवसाय या गाड्यांनी केला आहे.
दसऱ्याच्या दिवशी मोटारसायकल खरेदी करण्याकडे सर्वांचा जास्त कल असतो. बाजारपेठेत सर्व नामांकित मोटारसायकल कंपन्यांची शोरूमद्वारे ही विक्री होत असते. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीपेक्षा यंदा मोटारसायकलची विक्री जोरात होती. दसऱ्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुचाकीत मात्र पेट्रोल गाड्यांना इलेक्ट्रिक वाहनांपेक्षा थोडासा कमी प्रतिसाद दिसत होता. -तेज घाटगे, घाटगे ग्रुप, कोल्हापूर.
यंदा दसऱ्याला बाजारपेठेत ग्राहकांचा कमालीचा उत्साह दिसून आला. चारचाकीला यावेळी मोठी मागणी मिळाली. अनेकांना वेटिंगवर ठेवावे लागले. यंदा सरासरी ३० टक्के वाढ दिसून आली. -उदय लोखंडे, ट्रेन्डी व्हिल.