धुवाधार पावसामुळे पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर, कोल्हापूर जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 02:20 PM2022-09-13T14:20:50+5:302022-09-13T14:21:13+5:30
पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे
कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम राहिला. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी रात्री उशिरा पंचगंगा यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. जिल्ह्यातील ५१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे.
गेली दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. रविवारी रात्रीपासून थोडा कमी झाला होता, मात्र सोमवार सकाळपासून वाढला. गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड, चंदगड तालुक्यात जोरदार पाऊस कोसळला. आज, मंगळवारी पंचगंगा नदीच्या पातळी ३० फूट १ इंच इतकी होती.
राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा काल, सोमवारी पहाटे बंद झाला होता. मात्र सायंकाळी साडेसहा वाजता तो पुन्हा उघडल्याने धरणातून प्रति सेंकद ५८८४ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विविध नद्यांवरील ५१ बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे. पंचगंगा सायंकाळी काठोकाठ भरुन वाहत होती, रात्री उशिरा ती यंदाच्या मान्सूनमध्ये तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली.
दरम्यान, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात अचानक बदल झाला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा बदलल्याने जोरदार पाऊस कोसळत आहे. आज मंगळवारी कोल्हापुरात ‘ऑरेंज’ अलर्ट दिला असून, जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पडझडीत पावणेतीन लाखांचे नुकसान
साेमवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील २९ खासगी मालमत्तांची पडझड होऊन पावणेतीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
काढणीस आलेले सोयाबीन अडचणीत
हातकणंगले, शिरोळ तालुक्यात काही ठिकाणी सोयाबीन काढणीस आले आहे. मात्र पावसाने हे पीक अडचणीत आले आहे.