तक्रारी वाढल्या; कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शाखेचे दफ्तर केलं जप्त
By उद्धव गोडसे | Published: February 8, 2024 12:27 PM2024-02-08T12:27:28+5:302024-02-08T12:28:46+5:30
वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता
कोल्हापूर : शहराच्या वाहतुकीला शिस्त लावण्यासह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणाऱ्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेची पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कानउघडणी केली. स्वत: पोलिस ठाण्यात जाऊन अधीक्षक पंडित यांनी पोलिसांचे दफ्तर जप्त केले. या कारवाईनंतर दंड वसुलीचा ताण वाढल्यामुळे पोलिसांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे आणि पोलिस चौक्यांमधील घडामोडींवर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे बारकाईने लक्ष असते. दैनंदिन कामकाजात काही उणिवा लक्षात येताच ते संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलवून घेऊन समज देतात. यामुळे त्यांच्या कार्यशैलीचा पोलिसांमध्ये धाक आहे.
सोमवारी (दि. ५) सायंकाळी ते स्वत:च अचानक शहर वाहतूक नियंत्रण शाखेत पोहोचले. उपस्थित असलेले कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. रोज किती वाहनांवर दंडात्मक कारवाया होतात? किती दंड वसूल होतो? पावत्या आणि दंडाची रक्कम यांचा ताळमेळ आहे काय? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करून त्यांनी कर्मचाऱ्यांची झडती घेतली. कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने अखेर त्यांनी पोलिस ठाण्यातील दफ्तर, दंडाची पावती पुस्तके जप्त करून कर्मचाऱ्यांना खुलासा करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले.
चौकशीनंतर मंगळवारी दफ्तर आणि पावती पुस्तके परत दिली. मात्र, नागरिकांच्या तक्रारी वाढू नयेत, याबद्दल खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली. अधीक्षक पंडित यांनी अचानक येऊन केलेल्या कारवाईमुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेत खळबळ उडाली.
तक्रारी वाढल्या
शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील बिट मार्शल आणि सिग्नलवर थांबणारे वाहतूक पोलिस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाया करतात. अनेकदा जिल्ह्याबाहेरून येणारी वाहने पोलिसांकडून लक्ष्य केली जातात. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या ठिकाणी थांबून वसुली केली जाते. दंडाच्या रकमा मोठ्या असल्यामुळे दोनशे-तीनशे रुपयांत तडजोड केली जाते. दंड वसुली आणि प्रत्यक्ष कारवाया यात ताळमेळ नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेची झडती घेतली.