Kolhapur: हाळवणकरांनी धरला हात, आवाडे पिता-पुत्र भाजपात; तीन दशकानंतर पारंपरिक विरोधक एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 12:13 PM2024-09-26T12:13:20+5:302024-09-26T12:13:50+5:30
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचा हात हातात घेऊन माजी ...
कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या तीन दशकांपासून राजकीय प्रतिस्पर्धी राहिलेल्या आमदार प्रकाश आवाडे यांचा हात हातात घेऊन माजी आमदार, भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनाच आवाडे पिता-पुत्रांना भाजपमध्ये प्रवेश देण्याची वेळ बुधवारी आली. हयातभर विरोध केलेल्या आवाडे यांच्या भाजप प्रवेशासाठी हाळवणकर यांना घालाव्या लागलेल्या पायघड्यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची राजकीय समीकरणे बदलणार असली तरी पक्षाने आपल्याच निष्ठावंत पदाधिकाऱ्याचा घेतलेला बळी हाळवणकर समर्थक स्वीकारणार का, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे २०१९ पासून भाजप प्रवेशासाठी आतूर असलेल्या आवाडे यांना हाळवणकर यांच्या विराेधामुळेच प्रवेश करता आला नव्हता. आवाडे यांचा पक्षप्रवेश अगोदरच निश्चित झाला होता; परंतु हाळवणकर यांनी आवाडे पिता-पुत्रांना घेऊन व्यासपीठावर यावे, अशी घोषणा माइकवरून करण्यात आली. त्यावेळी काही क्षण सारेच थबकले. पक्षाचा आदेश मानून हाळवणकर हसतहसत उठले आणि प्रकाश आवाडे व राहुल यांना दोन्ही हातांना धरून घेऊन ते व्यासपीठावर गेले आणि आवाडे यांची भाजप प्रवेशाची प्रतीक्षा संपुष्टात आली.
इचलकंरजी विधानसभा मतदारसंघात आवाडे-हाळवणकर हे तीन निवडणुकांमध्ये आमनेसामने लढले. यात २००९ आणि २०१४ अशा सलग दोन निवडणुकांमध्ये सुरेश हाळवणकर यांनी प्रकाश आवाडे यांचा पराभव केला. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात सलग दोन वेळा कमळ फुलवल्याने भाजपमध्ये हाळवणकर यांचे राजकीय वजन वाढले. पुढे २०१९ च्या निवडणुकीत आवाडे यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि हिंदुत्ववादी मतांचे पाठबळ मिळावे म्हणून अपक्ष लढले व त्यात विजयी झाले.
निवडून आल्यावर त्यांनी लगेचच भाजपला पाठिंबा दिला, त्यामुळे ते पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती; परंतु त्यांना हाळवणकर यांच्या पक्षनिष्ठेने रोखून धरले होते. अखेर बेरजेच्या राजकारणाचा विजय झाला आणि आवाडे यांचे स्वागत करण्याची वेळ हाळवणकर यांच्यावरच आली. ज्यांचा प्रखर विरोध होता त्याच हाळवणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ द्यायला लावून आगामी विधानसभा निवडणुकीतील अडसरही आवाडे यांनी दूर केला.