रस्त्याच्या नावाने कोल्हापूर महापालिकेचे दरवर्षी ४५ कोटी खड्ड्यात, ठेकेदारांवर वचक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:22 PM2024-08-05T12:22:48+5:302024-08-05T12:24:05+5:30
प्रत्येक वर्षी पावसाळ्यात खराब रस्ते
कोल्हापूर : अधिकाऱ्यांशी असलेले संगनमत, ठेकेदारांना पोसण्याचे प्रशासनाचे उदार धोरण आणि त्यातून होणारे गुणवत्तापूर्वक रस्त्यांच्या कामाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे महानगरपालिकेचे प्रत्येक वर्षी सुमारे ४० ते ४५ कोटी रुपयांचा निधी केवळ खड्ड्यात जात आहे. त्याचा अनुभव यावर्षीही शहरवासीयांना येत आहे. दोष दायित्व कालावधीतील खराब रस्ते संबंधितांकडून दुरुस्त करून घ्या, असे आदेश वरिष्ठ अधिकारी देतात, परंतु, असे रस्ते दुरुस्त झाले किंवा नाहीत यांचाही हिशोब ठेवला जात नाही. त्यामुळेच ठेकेदारांचे लाड आता पुरे झाले, असे म्हणायची वेळ शहरवासीयांवर आली आहे.
नागरी स्वच्छता व आरोग्य सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी तसेच चांगले रस्ते हे महानगरपालिका प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. जनतेकडून गोळा केलेला कर आणि शासनाकडून येणारा निधी यांच्या माध्यमातून या सुविधा नागरिकांना देणे बंधनकारक आहे. या सुविधांपैकी पाणी आता जवळपास सर्वच भागात पोहोचले आहे. शहरातील स्वच्छता व कचरा उठाव बऱ्यापैकी होत आहे. परंतु, रस्त्यांची मात्र फारच वाईट परिस्थिती झाली आहे. खराब रस्त्यांमुळे यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांची हाडे खिळखिळी होऊ लागली आहेत.
कोल्हापूर महापालिका प्रत्येक वर्षी शहरातील रस्त्यांवर ४० ते ४५ कोटी रुपयांचा निधी खर्च करत असते. यामध्ये पालिकेचा स्वनिधी, आमदार, खासदार निधी, मूलभूत सेवा सुविधा आणि शासन अनुदानाचा समावेश असतो. गतवर्षी जवळपास एवढाच निधी नवीन रस्ते तयार करण्यासाठी तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी खर्च केला. परंतु हा सगळा निधी खड्ड्यात गेला आहे. खराब रस्ते तयार केले जात असताना अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. प्रत्येक वर्षी हाच अनुभव शहरवासीयांना येत आहे.
रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी ही उपशहर अभियंता व शहर अभियंता यांची आहे, मात्र एकदा वर्क ऑर्डर दिली की या अधिकाऱ्यांची जबाबदारी संपली अशी त्यांची भावना असते. खराब रस्ते झाल्यानंतर कोणी ठेकेदारांवर कारवाई करत नाही, त्यामुळे ठेकेदारांचेही फावले आहे. कशीही कामे केली तरी काहीच कारवाई होत नाही, अशी ठेकेदारांची समजूत झाली आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे रस्त्यांचा निधी खड्ड्यात जात आहे.
खराब रस्ते होण्याची कारणे
- वर्क आर्डर दिली की आपली जबाबदारी संपल्याची अधिकाऱ्यांची भावना
- रस्त्यांच्या गुणवत्तेकडे अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
- ठेकेदारांची मनमानी, कामात होणारी दिरंगाई
- रस्ते झाल्यानंतर त्याच्या गुणवत्तेचे ऑडिट केले जात नाही
- ठेकेदार - अधिकारी यांच्यात होणारे संगनमत
एरव्ही नगरसेवकांच्या माथी दोष
एरव्ही अधिकारी खराब रस्त्यांचे दोष नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या माथी मारताना पहायला मिळत असे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून महापालिकेत नगरसेवकच नसल्याने सर्व कारभार अधिकाऱ्यांच्या हाती एकवटला आहे. नगरसेवक असताना ठेकेदारावर कारवाई करण्यास अडचणी येत असल्याचे सांगितले जायचे. पण, आता नगरसेवकच नसल्याने खराब रस्ते तयार करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यास कोणी हात बांधले आहेत, असा सवाल विचारला जात आहे.
दोष दायित्व कालावधीतच खराब
शहरातील अनेक रस्ते दोष दायित्व कालावधीत खराब झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांची गुणवत्ता अतिशय खराब दर्जाची होती हे स्पष्ट आहे. ज्यांनी असे रस्ते केले त्यांच्याकडून पुन्हा रस्ते करून तर घ्यावेच परंतु संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकले तरच ते वठणीवर येतील आणि तीच शिक्षा योग्य आहे, असा शहरवासीयांचा दावा आहे.